बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्टनं तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला. आलिया भट्टनं अलिकडेच म्हणजे १४ एप्रिल २०२२ ला अभिनेता आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूरशी लग्न केलं. त्याआधी जवळपास ५ वर्षं दोघंही एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांनंतर आलियानं प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर आता आलियाच्या एका जुन्या मुलाखतीची बरीच चर्चा आहे आणि त्यावरूनच बाळासाठी आलियानं रणबीर कपूरशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
रणबीर कपूर आलियाला लहानपणापासूनच आवडत होता आणि याची कबुली तिने अनेक मुलाखतीमध्ये दिली होती. रणबीर कपूरला ५ वर्ष डेट केल्यानंतर आलियानं त्याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता लगेचच तिने प्रेग्नन्सीची घोषणा केली. सामान्यतः कोणतंच सेलिब्रेटी कपल असं करताना दिसत नाही. दरम्यान २०१८ साली दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं तिच्या मुलांबाबत मोठा खुलासा केला होता. त्यावेळी तिने असं काही सांगतिलं होतं जे तिच्या आताच्या निर्णयाशी मिळतं जुळतं आहे.
आणखी वाचा- DID Super Moms : ७६ वर्षीय मराठमोळ्या आजींचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
आलिया म्हणाली होती, “अनेकांना वाटत असेल की मी ३० वर्षांची झाल्यावर लग्न करेन. पण मी कधीही स्वतःलाच सरप्राइज देऊ शकते. असंही होईल की मी त्याआधीच लग्न करेन. मी अद्याप काहीच ठरवलेलं नाही. त्यामुळे मला योग्य वाटेल त्यावेळी मी नक्कीच लग्न करेन. पण मला या गोष्टीची खात्री आहे की मी बाळासाठी लग्न करेन. जेव्हा मला वाटेल की मला आता आई व्हायचंय आणि त्यासाठी मी तयार आहे त्यावेळी मी लग्न करेन.”
दरम्यान अलिकडे एका मुलाखतीत रणबीर कपूरनं आलियाच्या प्रेग्नन्सीबाबत हिंट दिली होती. फॅमिली प्लॅनिंगबद्दल त्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. लवकरच लकी नंबर ८ चा किंवा आपल्या बाळाच्या नावाचा टॅटू गोंदवून घेणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. याशिवाय या मुलाखतीत तो म्हणाला होता, “आता मला खूप काम करायचं आहे. मला माझी फॅमिली तयार करायची आहे. अगोदर मी स्वतःसाठी काम करत होतो आता मला माझ्या कुटुंबासाठी काम करायचं आहे.”