भूमिका कोणतीही असो, अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्यामध्ये स्वत:ला झोकून देतो. ‘रामलीला’मधील राम असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’मधील पेशवा बाजीराव, प्रत्येक भूमिकेला तो जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भूमिकेला पडद्यावर तितक्याच जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न करतो. याचाच परिणाम आता त्याच्या मनावर होऊ लागला आहे. आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात तो साकारत असलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेमुळे त्याला मानसिक आजार झाल्याचं म्हटलं जात आहे.

अलाउद्दीन खिल्जीसारखी नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून तो मानसिक तयारी करत होता. यासाठी त्याने स्वत:ला काही दिवस घरात कोंडून ठेवलं होतं. गेल्या वर्षभरापासून चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याने त्या भूमिकेचा परिणाम त्याच्या स्वभावावरही होऊ लागल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सेटवर अनेकदा तो कोणाला स्वत:च्या आसपासदेखील फिरकू द्यायचा नाही. रणवीरचा इतका गंभीर स्वभाव यापूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता. नेहमीच आपल्या अवतीभोवती खेळीमेळीचं वातावरण ठेवणाऱ्या रणवीरमध्ये असे अचानक बदल आल्याने चित्रपटाच्या टीमकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो काही दिवस सुट्टी घेऊन फिरायलाही जातो. मात्र यावेळी त्याने तसं काही केलं नाही. त्यामुळे आता रणवीरच्या मित्रांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञाची मदत घेण्यास सांगितले आहे.

वाचा : तैमुरला ‘हे’ पदार्थ आवडतात

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ हा चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ही राणी पद्मावतीच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये दीपिका पदूकोण पद्मावतीची भूमिका तर शाहिद पद्मावतीच्या पतीची म्हणजे रावल रतन सिंहची भूमिका साकारताना दिसणार आहे.