गेल्या अनेक दशकांपासून विविधांगी भूमिका साकारत रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आहेत. आपल्या मुलांना मोठे करताना जबाबदाऱ्यांच्या चक्रात आई-बाबा नकळतपणे अडकून जातात. आयुष्याच्या संध्यापर्वात मुलांच्या संसारापायी घरातच अडकलेल्या एका जोडप्याची कथा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत गुंफलेली आहे. विविध कलाकृतींमध्ये काम करीत असताना वेळेच्या गणितासह आरोग्याची काळजी आदी विविध गोष्टी कशा जुळवून आणल्या जातात, कथानक असो किंवा तांत्रिक गोष्टी आदी गोष्टींच्या अनुषंगाने पूर्वीचे मालिकाविश्व आणि आताचे मालिकाविश्व यात काय बदल झाले, आदी विविध गोष्टींबाबत निवेदिता सराफ यांच्याशी साधलेला हा संवाद….

● कौटुंबिक कलह, प्रेमकथा आणि थरारक नाट्य या सर्व कथानकांमध्ये तुमच्या मालिकेचे वेगळेपण काय?

बदलत्या काळानुसार आजच्या पिढीला एकत्र कुटुंब पद्धतीच्या पलीकडे जाऊन वेगळे राहायचे असते, परंतु ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत आधुनिक विचारसणीवर भर दिला आहे. आपण मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद करण्यासाठी प्रसंगी एकमेकांपासून दूर राहून पैसे कमावले. आता मुले मोठी झाली असून स्वत: पैसे कमावत असल्यामुळे त्यांना मोकळीक दिली पाहिजे. निवृत्तीनंतर या सर्व जबाबदारीतून मोकळे होऊन आपण वेगळे राहू या. एकमेकांना वेळ देऊ या आणि स्वत:च्या आवडी – निवडीवर पैसे खर्च करू या, या मताचे बाबा आहेत. आईचा जीव मात्र मुले, नातीगोती आणि संसारात अडकला आहे. आपण वेगळे राहू या, परंतु निवृत्तीनंतर काही काळ घरातच मुलांसोबत राहू, या विचारसरणीची आई आहे. या मालिकेतील संवादही सहज सुंदररीत्या लिहिलेले आहेत. त्यामुळे एक वेगळे कथानक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

हेही वाचा >>>हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”

● एकत्र कुटुंबपद्धती किती महत्त्वाची आहे?

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत कोणतेही नकारात्मक पात्रं किंवा खलनायक नाही. पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी आहे. लग्नानंतर मला एकत्र कुटुंबात राहायचे नसून मला माझा वेगळा संसार करायचा आहे, असे सुनेने लग्न जमवताना सांगितलेले असते. तेव्हा सुरुवातीचे काहीच दिवस एकत्र कुटुंबपद्धतीत राहायचे ठरते. सर्व गोष्टी सुरुवातीलाच ठरलेल्या असल्यामुळे सून ही खलनायिका ठरत नाही, सुनेचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे या मालिकेत वैचारिक भिन्नता पाहायला मिळेल. तसेच सध्याच्या स्पर्धात्मक जगात आई आणि वडील हे नोकरी – व्यवसायात प्रचंड व्यग्र झाले आहेत. या धावपळीत घर सांभाळण्यासाठी व मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी आजी – आजोबा व घरातील इतर मंडळींचा आधार मिळाल्यास ते उत्तमच ठरेल. हा प्रत्येकाचा वेगळा विचार असून त्याला तुम्ही एकाच साच्यामध्ये बांधू नाही शकत. त्यामुळे एकत्र व एकल या दोन्ही कुटुंब पद्धतीची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. दोन्ही कुटुंब पद्धतीचे फायदे-तोटे आहेत. जी कुटुंबपद्धत तुमच्या सोयीची ठरते, ती तुम्ही निवडून पुढे जावे या मताची मी आहे.

● पूर्वीचे मालिकाविश्व आणि आताचे यात नेमका काय बदल जाणवतो?

पूर्वीचे मालिकाविश्व आणि आताचे मालिकाविश्व पाहिल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या प्रचंड बदल झालेले लक्षात येतात. पूर्वी कॅसेट वगैरे होत्या, परंतु आता अनेक गोष्टी या डिजिटल झाल्या आहेत. कॅमेरा, ध्वनीयंत्रणा, प्रकाशयोजना आदी गोष्टी बदलल्या आहेत. सध्या प्रेक्षकांना नैसर्गिक पद्धतीचा अभिनय जास्त आवडतो. तर भावभावनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही कलाकार समर्पित भावनेनेच काम करत असून काम करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही.

● नाटक, मालिका आणि चित्रपट चित्रीकरणाच्या धावपळीत वेळेचे गणित कसे जुळवता?

आयुष्यात आपण निरनिराळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या आणि सदर गोष्टी वेळ न चुकवता संबंधित टप्प्यावर पूर्ण केल्या, तर वेळेचे गणित सहज जुळून येते. त्यामुळेच विविध कलाकृतींमध्ये काम करत असतानाही ‘ठ्र्र५ीि३ं रं१ंऋ फ्रीूस्री२’ ही माझी यूट्यूब वाहिनी अविरतपणे सुरू आहे. आमच्या घरात आई आणि मुलीची एक जोडी विविध कामे करण्यासाठी येते, असे मी कधीच म्हणणार नाही. या दोघीही आमच्या कुटुंबाचाच एक भाग असून त्यांचा मला खूप मोठा आधार आहे. मी आणि अशोक आम्ही दोघेही बाहेरचे खात नाही. आम्ही दोघेही घरून डबे घेऊन जातो. आठवड्याच्या सातही वारांनुसार दररोज काय करायचे ही ठरवून पूर्वतयारी केलेली असते. या संपूर्ण प्रवासात अशोकची मला खंबीरपणे साथ आहे. त्यांच्या काहीही मागण्या नसतात, मला काम करण्यासाठी ते नेहमी प्रोत्साहित करत असतात.

हेही वाचा >>>Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● नामवंत कलाकार, लेखक – दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची फौज…

‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ या मालिकेत निवेदिता सराफ या शुभा किल्लेदार ही आईची आणि मंगेश कदम हे यशवंत किल्लेदार ही बाबांची भूमिका साकारत आहेत. तर हरीश दुधाडे, प्रतीक्षा जाधव, आदिश वैद्या, पालवी कदम, किआरा मंडलिक, अपूर्वा परांजपे, स्वप्निल आजगावकर हे कलाकारही मालिकेत आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन शैलेश डेरे यांनी केले असून लेखन हे सचिन दरेकर, चिन्मय मांडलेकर आणि स्वरा मोकाशी यांनी केले आहे. तर मनवा नाईक हिने निर्माती म्हणून धुरा सांभाळली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी २.३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित होत आहे.