त्या दुर्दैवी घटनेबद्दल शाहरुखने व्यक्त केली दिलगिरी

त्या घटनेदरम्यान गर्दीत गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता

छाया सौजन्य- ट्विटर/ एएनआय

अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या रईस या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वेगळ्या मर्गाचा अवलंब करत किंग खानने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने प्रवास करण्याचा निर्णय घेत मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दिन म्हणजेच दिल्लीपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. पण, शाहरुखच्या या प्रवासाबद्दल विविध क्षेत्रांतून आता संमिश्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. कारण, शाहरुखच्या या रेल्वे प्रवासादरम्यान वडोदरा येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री बडोदा रेल्वे स्थानकावर शाहरूख पोहोचला असता त्याला पाहण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या गर्दीत गुदमरून एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. मृत व्यक्ती ही माजी नगरसेवक असल्याचे समजते. सदर घटनेविषयी शाहरुख अनभिज्ञ होता. पण, या घटनेसंबंधीची माहिती मिळाल्यानंतर शाहरुखने सदर घटनेबद्दल एएनआय या वृत्तसंस्थेविषयी बोलताना दिलगिरी व्यक्त केली. ‘ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या प्रार्थना आहेत’, असे शाहरुखने म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास बडोदा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर रेल्वे १० मिनिटे थांबली होती. या वेळी शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. जेव्हा रेल्वे थांबली तेव्हा गर्दी अनावर झाली. त्यांनी रेल्वे डब्यांच्या खिडक्या वाजवण्यास सुरूवात केली. या दरम्यान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले त्याचे चाहते एकमेकांवर पडले. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीमार करावा लागला. रेल्वे निघाल्यानंतर चाहतेही रेल्वेबरोबर पळू लागले. त्यामुळे धावाधाव सुरू झाली. यात एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव फरहीद खान असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरहीद खान हे समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे समजते.

दरम्यान, ब-याच वर्षानंतर शाहरूखने मुंबई ते दिल्ली रेल्वेने प्रवास केला असल्याचेही त्याने वृत्तसंस्थेशी बोललाता स्पष्ट केले. चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया आणि निर्माता रितेश सिधवानीही त्याच्याबरोबर असून ‘रईस’ची ही टीम आता दिल्लीमध्ये या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. तुर्तास किंग खानच्या चित्रपट प्रमोशनसाठी उसळणारी गर्दी आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास यामुळे अनेकांनीच शाहरुखविरोधात सूर आळवला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Its unfortunate my prayers are with the family of the deceased shah rukh khan on vadodara railway station during raees movie