नवीन युगात कालानुरूप बदलत जाणारे नात्यांचे स्वरूप आणि भावनिक गुंतागुंत मांडणारी सुरेख कथा प्रकाश कुंटे या दिग्दर्शकाने ‘& जरा हटके’ या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव निर्मित आणि इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला.
‘&’ हे मुळाक्षर दोन वेगवेगळ्या शब्दांना एकत्र करणारे असल्यामुळे या चित्रपटात हटके लव्हस्टोरी बघायला मिळणार आहे. एका मध्यमवयीन स्त्री-पुरूषाच्या सुंदर नात्याभोवती सिनेमाची कथा रंगत असल्याची जाण हा ट्रेलर पाहताना होतो. मध्यमवयात पुन्हा विवाह करण्यासारखा धाडसी निर्णय हे जोडपं घेतं. मग त्याचं हे नातं त्यांची मुलं कसे स्वीकारतात, यावर हा चित्रपट अधोरेखित करण्यात आला आहे. त्यांच्यातील वाद, हेवेदावे आणि याबरोबरच ओघाने येणाऱ्या दोन पिढ्यांमधील अंतराचा समतोल ‘& जरा हटके’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. तसेच, मराठी आणि बंगाली जोडप्याची ही प्रेमकथा असल्याचे या ट्रेलरमधून दिसून येते.
दरम्यान, ‘& जरा हटके’ या चित्रपटातील मृणाल कुलकर्णी आणि इंद्रनील सेन गुप्तां या जोडीवर आधारित ‘सांग ना’ हे रोमँटिक जॉनरचे गाणे देखील यावेळी प्रदर्शित करण्यात आले. मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या ह्या गाण्याचे आदित्य बेडेकर यांनी संगीत दिग्दर्शित केलं असून, शैल हडा आणि हमसीका अय्यर या जोडगोळीने आपल्या सुरेल आवाजाने स्वरताज चढवला आहे.
आधुनिकीकरणाच्या या युगात वेगाने बदलत असलेली नात्यांची संकल्पना आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या समस्या प्रत्येकांच्या घराघरात पाहायला मिळतात. अशावेळी नात्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी ‘&’ हा महत्वाचा असतो, मात्र मिताली जोशी लिखित या चित्रपटातला ‘&’ इतरांहून जरा हटकेच असल्यामुळे ‘& जरा हटके’ हा चित्रपट कुतूहलाचा विषय ठरत आहे. बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहे. इंद्रनील सोबतच मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, शिवानी रांगोळे, स्पृहा जोशी, सुहास जोशी, सोनाली आनंद, संदेश कुलकर्णी हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jul 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: ‘& जरा हटके’चा हटके ट्रेलर
नात्यांची संकल्पना आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या समस्या प्रत्येकांच्या घराघरात पाहायला मिळतात.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 08-07-2016 at 11:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jara hatkes second trailer