कोर्टाची रूम, काळे कोट घातलेले वकील, अशील आणि फिर्यादी यांचा गोतावळा हे चित्र मराठी मालिकांमध्ये फारसे दिसत नाही. फारतर मालिकेतील एखाद्या जोडप्याचा घटस्फोट किंवा एखाद्या छोटय़ाशा खटल्यानिमित्त काही क्षणांपुरती मालिकेत कोर्टरुम दिसते. आता न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांवरच आधारित असलेली ‘जयस्तु’ ही पहिलीवहिली मराठी मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’वर येणार आहे. कोर्टाच्या चार भिंतींच्या आत नक्की काय घडते, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पण मालिकांमध्ये कोर्टरुममध्ये चालणाऱ्या खटल्यांपेक्षा भावनिक गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाते. ‘जयस्तु’मुळे प्रेक्षकांना खटले कसे चालतात, याचाही अनुभव लाभणार आहे. महेश कोठारे यांच्या निर्मितीसंस्थेची ही मालिका अनिल राऊत यांनी दिग्दर्शित केली असून त्यात प्रिया मराठे प्रमुख भूमिकेत आहे. या संदर्भात सांगताना प्रियाने सांगितले की, ‘मी या मालिकेमध्ये प्रगती राजवाडे या प्रामाणिक वकिलाची भूमिका साकारत आहे. ती केवळ सत्याचा पाठपुरावा करते. तिला गरीबांसाठी आणि गरजू लोकांसाठी काम करायला आवडते आणि त्यासाठी प्रसंगी केवळ एक रुपया नाममात्र शुल्क घेऊनही ती खटला लढते.’
‘तू तिथे मी’ सारख्या मालिकांमधून खलनायिकेच्या भूमिकांमधून लोकप्रिय झालेली प्रिया पहिल्यांदाच एका प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. लोकांनी मला आतापर्यंत खलनायिकेच्या भूमिकेत पाहिले आहे, त्यामुळे ही भूमिका साकारताना भावनेच्या भरात कुठेही नकारात्मक छटा येणार नाही ना, याची काळजी घेतली असल्याचे तिने सांगितले. याखेरीज गिरिश परदेशी यांनी खलनायकी छटा असलेली सबनीस वकिलांची भूमिका साकारली आहे. दर आठवडय़ाला प्रिया एका नवीन खटल्याला कशी सामोरी जाते, हे मालिकेत दाखवले जाणार आहे.
मालिकेच्या प्रसारणाची वेळ घोषित झाली नसली तरी, ऑगस्टअखेरीस स्टार प्रवाहवरील ‘ढाबळ’ प्रेक्षकांची रजा घेणार असून त्याजागी आठवडय़ातून दोनदा किंवा तीनदा ही मालिका प्रसारित होण्याची शक्यता वाहिनीच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
मराठी मालिका कोर्टाची पायरी चढणार
कोर्टाची रूम, काळे कोट घातलेले वकील, अशील आणि फिर्यादी यांचा गोतावळा हे चित्र मराठी मालिकांमध्ये फारसे दिसत नाही. फारतर मालिकेतील एखाद्या जोडप्याचा घटस्फोट किंवा एखाद्या छोटय़ाशा खटल्यानिमित्त काही क्षणांपुरती मालिकेत कोर्टरुम दिसते.

First published on: 30-07-2014 at 06:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayastu a new daily soap on star pravah