थरार, रोमांच, उत्कंठा आणि जल्लोष या साऱ्या विशेषणांनी ओळखला जाणारा ९०वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यात रेड कार्पेटवरील कलाकारांचे अनोखे अंदाज, होस्ट जीमी किम्मेलची तुफान विनोदी फटकेबाजी, जबरदस्त स्टेज परफॉर्मन्स, पुरस्कार स्वीकारणारे कलाकार आणि त्यांच्या अभूतपूर्व यशाला अभिवादन करणारे प्रेक्षक यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला. परंतु फ्रान्सेस मॅकडोर्मंडचे ऑस्कर सन्मानचिन्ह चोरीला जाणे, सुरक्षारक्षक व काही कलाकारांमध्ये झालेली बाचाबाची यांसारख्या काही घटनांमुळे या सोहळ्याला काहीसे गालबोटही लागले. असाच काहीसा गोंधळ ‘एक्समेन’ फेन अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी घातला.

सर्व प्रेक्षक कलाकार सभागृहात स्थानापन्न होत असताना जेनिफर दारूने भरलेला ग्लास घेऊन सभागृहात पोहोचली. दारूच्या नशेत असल्यामुळे तिला आपली जागा सापडत नव्हती. दरम्यान, तेथील काही सुरक्षारक्षकांनी तिला तिच्या जागेवर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी ती इतक्या नशेत होती की तिने सर्वाना शिव्याशाप देत थेट खुर्च्यावरून उडय़ा मारण्याचा प्रयत्न केला. तिचा हा आरडाओरडा पाहून आजूबाजूचे कलाकार काहीसे अवाक् झाले. परंतु प्रकरण वाढण्यापूर्वी लगेचच अभिनेत्री मेरिल स्ट्रीप व एमा स्टोन या दोघींनी तिला पकडून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढे एमा स्टोनने काही विनोदी भाष्य करत सर्वाच्या नजरा स्वत:कडे वळवून घेतल्या. तोवर मेरिल स्ट्रीपने तिला शांत करत तिच्या जागेवर नेऊन बसवले. मेरिल व एमाच्या प्रसंगावधानामुळे पुढचा अनर्थ टळला आणि वातावरण पुन्हा पहिल्यासारखे झाले.

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ही हॉलिवुडमधील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तीची एक्समेन चित्रपट मालिकेतील मिस्टिक ही व्यक्तिरेखा विशेष लोकप्रिय ठरली होती. २०१७ मध्ये मदर चित्रपटातील व्हेरोनिका या वादग्रस्थ व्यक्तिरेखेमुळे ती चर्चेत होती.