अभिनेत्री जिया खानच्या तीन वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे. ब्रिटनमधील न्यायवैद्यक तज्ज्ञांनी जियाच्या शरिरावरी खूणा आणि इतर पुराव्यांच्या आधारे जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे म्हटले आहे. या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार जियाची हत्या करून नंतर तिला लटकविण्यात आले होते. या नव्या खुलाशामुळे अभिनेता सुरज पांचोलीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जिया प्रकरणी भारतीय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाशी जियाची आई राबिया खान या सहमत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी ब्रिटीश तज्ज्ञ पायने-जेम्स यांच्याकडून वैद्यकीय व शवविच्छेदन अहवालांची आणि जियाच्या मृत शरीराच्या छायाचित्रांची न्यायवैद्यक तपासणी करून घेतली. जेसन यांनी जियाच्या रुममधील सीसीटीव्ही फुटेज आणि छायाचित्रांची तपासणी केली. त्यानंतर जेसन यांनी जियाच्या ओठांवर दिसलेल्या खूणा पाहून सदर खूणा या ‘ब्लंट फोर्स ट्रॉमा’ च्या दिशेने बोट करत असल्याचा दावा केला. तसेच, तिच्या गळ्यावर असलेल्या खूणा या ओढणीच्या नसल्याचेही त्यांनी म्हटलेय. त्यामुळे जेसन यांच्या अहवालाने भारतीय तज्ज्ञांनी तयार केलेल्या अहवालावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राबिया हा अहवाल सत्र न्यायालयात सादर करणार आहेत. पण, न्यायालय हा अहवाल स्विकारेल की नाही ते येणारी वेळच सांगेल. कारण सदर अहवाल कोणत्याही सरकारी संस्थेने दिला नसून खासगी संस्थेने दिला आहे.
वृत्तपत्राच्या माहितीनुसार, सूरजचे वडिल आणि अभिनेता आदित्य पांचोली याने सदर अहवालास धुडकावून लावले आहे. हा अहवाल एका खासगी संस्थेने तयार केला आहे. पैसे देऊन खासगी संस्थांकडून अहवाल तयार करून घेता येतो. या प्रकरणाची तपासणी विविध संस्थांकडून करण्यात आली असून सर्वांनी एकच निष्कर्ष काढला आहे, असे आदित्य पांचोलीने म्हटलेय.
मुंबईतील जुहू परिसरातील जियाच्या अपार्टमेन्टमध्ये ३ जून २०१३ रोजी तिचे मृत शरीर सापडले होते. त्यावेळी जिया ही सूरजला डेट करत होती.