कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने त्यांना ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी यावर अभिनेता संजय दत्तचे उदाहरण देत प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतीच जॉनी लिव्हर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. ‘मी भारती आणि हर्षला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुमच्यासोबत काम करणाऱ्या छोट्या आणि मोठ्या कलाकारांना ड्रग्जचे सेवन न करण्याचा सल्ला द्या’ असे जॉनी लिव्हर म्हणाले.

पाहा: प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या विनोदवीरांच्या पत्नी पाहिल्यात का?

पुढे ते संजय दत्तचे उदाहरण देत म्हणाले की, ‘संजय दत्तकडे पाहा, त्याने त्याची चूक संपूर्ण जगासमोर मान्य केली. यापेक्षा मोठे उदाहरण काय हवे? तुमची चूक मान्य करा आणि ड्रग्ज सोडण्याचा निर्णय घ्या.’

आणखी वाचा : ‘ड्रग्ज न घेता कॉमेडी करु शकत नाही का?’, राजू श्रीवास्तवचा भारती सिंहवर निशाणा

अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ अढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारतीने अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला आहे.