विदूषक म्हटले की रंगरंगोटी केलेला, चित्रविचित्र कपडे घातलेला, आपल्या हालचालींनी लोकांना हसवणारा एक विनोदी चेहरा डोळ्यासमोर येतो. सर्कस, मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून या चेहऱ्याच्या करामती आपण पाहिल्या आहेत. परंतु याच्या उलट याच चेहऱ्याचे भेदक स्वरूप ‘सुसाइड स्क्वॉड’, ‘द मॅन हू लाफ’, ‘द लिटिल प्रिंसेस’, ‘ईट’, ‘द मास्क’, ‘किलिंग जोक’ यांसारख्या अनेक हॉलिवूडपटांतून दिसले आहे. विनोद आणि भीती हे दोन्ही अनुभव देणारी विदूषक ही दृश्यमाध्यमातील सर्वात यशस्वी परंतु तितकीच शापित व्यक्तिरेखा समजली आते. आश्चर्याची बाब म्हणजे डीसी या निर्मिती संस्थेच्या चित्रपटांसाठी ज्या कोणत्या अभिनेत्याने ही व्यक्तिरेखा साकारली तो प्रत्येक अभिनेता मानसिक रुग्ण झाला.

जॅक निकोलसन, मार्क हॅमिल, जेरेड लेटो, कॅसर रोमेरो, रॉजर स्टोनबर्नर, हिथ लेजर आणि जोक्विन फिनिक्स या सात अभिनेत्यांनी डीसी चित्रपटांमध्ये विदूषकाची भूमिका साकारली आहे. यांपैकी जोक्विन फिनिक्स वगळता इतर सर्व अभिनेते विदूषक साकारल्यानंतर मानसिक रुग्ण झाले. जोकर ही आजवरच्या सर्वोत्कृष्ट खलनायक व्यक्तरेखांपैकी एक म्हणून ओळखली जाते. १९४० साली बॉब केन यांनी डिसी कॉमिक्ससाठी जोकरची निर्मिती केली होती. सुरुवातीच्या काळात बॅटमॅन कॉमिक्समधील मुख्य खलनायक म्हणून या व्यक्तिरेखेचा वापर केला गेला. परंतु त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डीसीने या विदूषकाचा वापर चित्रपटांमध्ये देखील करण्यास सुरुवात केली.

जोकर ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली व्यक्तिरेखा आहे. ही व्यक्तिरेखा साकारणारे सर्वच अभिनेते हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक होते. कोणतीही व्यक्तिरेखा साकारण्याआधी ते त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करायचे. जोकरचा सूक्ष्म अभ्यास केल्यामुळे ती व्यक्तिरेखा हळूहळू त्यांच्या वर्तनात देखील उतरली. परिणामी त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला. आणि पुढच्या काही कालावधीत तर ते मानसिक रुग्ण म्हणूनच घोषीत केले गेले. यातील जेरेड लेटो, कॅसर रोमेरो, रॉजर स्टोनबर्नर हे तीन अभिनेते दिर्घ उपचारानंतर या मानसिक अस्थिरतेतून बाहेर आले. मात्र उर्वरित अभिनेत्यांची याच अस्थिर अवस्थेमुळे अभिनय कारकिर्द संपुष्टात आली.