अभिनेता अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांचाच आवडता अभिनेता आहे. विविध प्रकारच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचे एका व्हिडिओद्वारे त्याचा आनंद व्यक्त केला आहे. २०१७ या वर्षांच्या सुरुवातीलाच जॉली एलएलबी २ या चित्रपटाच्या वाट्याला आलेल्या यशामुळे अभिनेता अक्षय कुमार भलताच आनंदात आहे. अक्किने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एका व्हिडिओद्वारे त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

बुधवारी रात्री खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आजवर प्रेक्षकांनी चित्रपटांना भरभरुन दिलेल्या प्रतिसादासाठी अक्षयने या व्हिडिओद्वारे प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच काही वेगळ्या गोष्टींवरही या पाच ते सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अक्षयने भाष्य केले आहे. मुख्य म्हणजे खिलाडी कुमारने त्याच्या आनंदाचे खरे गुपितही या व्हिडिओमध्ये उघड केले आहे. ‘मी गेल्या २५ वर्षांपासून आयुर्वेद उपचारपद्धतीला फॉलो करत आहे. नुकतेच मी १४ दिवस केरळातील आयुर्वेद आश्रमातही काही क्षण व्यतीत केले. हा खरंच एक स्वर्गीय अनुभव होता.’, असे अक्षय कुमार सांगत आहे. ‘टीव्ही, जंक फूड, फोन आणि महागडे कपडे या सर्वांशिवाय साध्या राहणीमानाचे आणि आयुर्वेदाचे महत्त्व येथे मला पाहायला मिळाले’, असेही अक्षय कुमारने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीचे महत्त्व पटवून देण्यासाठी खिलाडी कुमार नेहमीच पुढे सरसावत असतो. त्यामुळे या व्हिडिओमध्येही तो सर्वांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहे.

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र असला तरीही तो चर्चेत आहे हे म्हणायला हरकत नाही. यंदाच्या वर्षी बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार विविध धाटणाच्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जॉली एलएलबी २ या चित्रपटाने सुरुवात झालेला अक्षयच्या यंदाच्या चित्रपटांच्या यादीत ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘पॅडमॅन’, ‘नाम शबाना’ अशा चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, खिलाडी कुमारच्या जॉली एलएलबी २ या चित्रपटाने नुकताच शंभर कोटींच्या कमाईचा आकडा पार केला असून अजूनही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची सरशी पाहायला मिळत आहे.