काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाने आता १०० कोंटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. २०१७ या वर्षाच्या सुरुवातीला ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवत आहे. ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाने आतापर्यंत १००.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट आणि चित्रपट समीक्षक तरन आदर्शने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे जॉलीच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर उघड केले आहेत. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या बरोबरीत आता खिलाडी कुमारचा आणखी एक चित्रपट आला आहे. याआधी त्याच्या रावडी राठोड, रुस्तम, एअरलिफ्ट, हॉलिडे, हाऊसफुल्ल ३ या चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला होता.
#JollyLLB2 crosses ₹ 100 cr on Day 12… [Week 2] Fri 4.14 cr, Sat 6.35 cr, Sun 7.24 cr, Mon 2.48 cr, Tue 2.45 cr. Total: ₹ 100.37 cr.
— taran adarsh (@taran_adarsh) February 22, 2017
‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात भारतात शुक्रवारपर्यंत ८१.८५ कोटी तर भारताबाहेर २२ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. अर्थात प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्यावर प्रेमाचा वर्षाव त्या दिवशी केला होता असे म्हटले चुकीचे करणार नाही. कारण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चित्रपटाने तब्बल ९.०७ कोटींचा गल्ला कमविला होता. १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षकांचीही पसंती मिळाली होती. ‘जॉली एलएलबी २’ ने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमविला होता. चौथ्या दिवशी चित्रपटाने ५७.६१ कोटींचा गल्ला कमविलेला, तर मंगळवारी ९.०७ कोटी, बुधवारी ५.८९ कोटी, गुरुवारी ५.०३ कोटी रुपये कमविले होते. त्यानंतर ‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन देखील ‘जॉली एलएलबी २’ ने ४.१४ कोटींचा गल्ला जमविला. या चित्रपटाने शुक्रवारपर्यंत ८१.८५ कोटी इतकी कमाई केली होती.
सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटात अक्षय व्यतिरीक्त हुमा कुरेशी, अन्नु कपूर, यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘जॉली एलएलबी २’ची कथाही कोर्टातील एका केसभोवती गुंफण्यात आलीये.