पार्थ प्रोडक्शन्स, गुर्जित सिंग बिंद्रा प्रस्तुत आणि एआरबी ९ फिल्म्स निर्मित “जर्नी प्रेमाची” या आगामी मराठी चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा, पोस्टर लाँच तसेच ट्रेलर प्रकाशन सोहळा दादर मधील प्लाझा प्रिव्ह्यूव थेटर येथे नुकताच पार पडला. या वेळी “जर्नी प्रेमाची” चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भावे, निर्माते आदिल बलोच, प्रस्तुतकर्ता पार्थ शाह अभिनेता अभिषेक सेठिया, अभिनेते प्रदीप पटवर्धन, अभिनेत्री दीपज्योती नाईक, संगीतकार निखिल कामत, गीतकार आशय परब, विमल कश्यप, गायक पूरण शिवा, गायिका अॅनी चॅटर्जी या कार्यक्रमास उपस्थित होते.
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं” असं पाडगावकर म्हणतात खरं, पण प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी खूप वेग-वेगळी असते. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो. अलगद हळुवारपणे नकळत उलगडणारी ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधीना कधी डोकावतेचं. प्रेमाचे रंग, रूपं अनेक आहेत. फेब्रुवारी महिना आला की या प्रेमाच्या रंगांना आणखीन उधाण येतं. म्हणूनच प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जाणाऱ्या या फेब्रुवारी महिन्यात येत्या १७ तारखेला “जर्नी प्रेमाची” हा एक नवीन प्रेम प्रवास असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे.
[jwplayer vFC2G5fA]
“जर्नी प्रेमाची” या चित्रपटात, “श्वास अंतरीचा तूच तू, ध्यास जगण्याचा तूच तू.”, “पाहतो मी आरसा, हा चेहरा ना माझा.”, “प्रेमाचा गोड रसगुल्ला, जसा तोंडामध्ये मावला.” यांसारखी एका पेक्षा एक उत्कृष्ट अशी रोमँटीक गाणी आपल्याला ऐकावयास मिळणार आहेत. त्याच बरोबर “हे मालिक हे दाता” सारखं मनाचा ठाव घेणारं हृदयस्पर्शी गाणं सुद्धा आपणांस या चित्रपटाद्वारे पाहावयास मिळणार आहे. “जर्नी प्रेमाची” चित्रपटातील सर्व गाणी संगीतकार निखिल कामत यांनी संगीतबद्ध केलेली असून गाण्याचे गीतकार, गायक व त्यांच्या संपूर्ण टीमच मेहनत आपल्याला या गाण्यांतून दिसून येते आहे.
जर्नी प्रेमाची या रोमँटिक चित्रपटात मुख्य भूमिकेत माधव देवचक्के, अभिषेक सेठिया, काश्मीरा कुलकर्णी यांची प्रेम कहानी दिसणार असून *तुझ्यात जीव रंगला* फेम *हर्षित जोशी* ह्या सिनेमाद्वारे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबत आश्लेषा सिंग, वर्षा एरणकर, अतुल अभ्यंकर, पराग बेडेकर यांचाही महत्वपूर्ण भूमिका आहेत.
[jwplayer SuEf42hL]
मालिकांद्वारे घरा घरात पोहचलेले गुणी दिग्दर्शक अमोल भावे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, संवादही त्यांनीच लिहिले आहेत. कथा पटकथा राहुल पंडित, हिलाल अहमद व दिनेश देवळेकर यांनी लिहिली आहे. नृत्य दिग्दर्शन विकी खान यांचे असून, कला दिग्दर्शन संदेश निटोरी यांचे आहे. संकलन जफर सुल्तान यांचे असून वेशभूषा एकता भट यांनी केली आहे. जर्नी प्रेमाची येत्या १७ फेब्रुवारी २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असल्याचे प्रस्तुतकर्ता पार्थ शाह यांनी सांगितले.