काही वर्षांपूर्वी भद्रकाली प्रॉडक्शन्सनं हृषिकेश परांजपेलिखित ‘हलकंफुलकं’ हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. त्यात विजय कदम आणि रसिका जोशी ही जोडगोळी अक्षरश: धूमशान घालीत असे. आजही त्या प्रयोगाच्या आठवणी रसिकांच्या मनात ताज्या आहेत. या पाश्र्वभूमीवर भद्रकालीने ‘just हलकंफुलकं’ हे नाटक काही नव्या संदर्भाची भर घालून पुनश्च रंगमंचावर आणलं आहे. ज्यांनी जुनं ‘हलकंफुलकं’ पाह्य़लंय, त्यांना नव्या प्रयोगाबद्दल उत्सुकता लागून राहणं स्वाभाविक आहे. त्यांची तहान या नव्या प्रयोगात शमतेच; त्याचबरोबर नव्या दमाच्या कलावंतांचा हरहुन्नरीपणही लक्ष वेधून घेतं. ज्यांनी याचा पूर्वीचा प्रयोग पाहिलेला नाही, त्यांना तर हे भन्नाट हास्यस्फोटक रसायन भयंकर आवडतं.  
‘just हलकंफुलकं’ला रूढार्थानं ठोस असं कथानक नाही. जे किंचित आहे, ते जातिव्यवस्थेच्या दुरभिमानातून माणूसपणाच्या कशा चिरफळ्या उडतात, हे दाखवतं. माणुसकी नावाची चीज माणसाला परस्परांशी कसं जोडते, हा संदेश जाता जाता नाटकात दिलेला आहे. खरं तर त्याची काही आवश्यकता नव्हती. नाटकात जे घडतं, त्यातून पाहणाऱ्याला जो काय मिळायचा तो संदेश मिळतोच. पुन्हा त्याचं बाळबोधीकरण करून सूत्रधारानं सांगण्याची गरज नव्हती.
चाळीतल्या ‘नमुने’दार शेजाऱ्यांचे अर्कचित्रात्मक कोलाज असं या नाटकाचं वर्णन करता येईल. साहजिकच नाटकात कथानकापेक्षा या ‘नमुन्यां’च्या वागण्या-बोलण्यातून, त्यांच्या विविध गंडांतून, तसंच स्वभाववैचित्र्यातून आणि मुख्य म्हणजे त्यांच्या जातीबद्दलच्या अतिरेकी अहंगंडातून धमाल मजेशीर प्रसंग निर्माण होतात. त्या सगळ्यांच्या परस्परसंबंधांवर याचं सावट येतं आणि ते भयंकर ताणले जातात. त्यातून मग एकमेकांबद्दल पराकोटीचा वैरभाव त्यांच्यात उत्पन्न होतो. आणि बदला घेण्याच्या भाषेपर्यंत या प्रकरणाची मजल जाते.
अर्थात अशी ‘रंगीबेरंगी’ माणसं एकाच चाळीत असू शकतात का, असा प्रश्न कुणालाही पडेल. पण ज्यांनी चाळसंस्कृती अनुभवली आहे त्यांना यात काही वावगं वाटणार नाही. चाळीचं म्हणून एक कल्चर शहरांतून पूर्वी होतं. आता ते बहुतेक लयाला गेलं आहे. चाळीतले लोक एकमेकांच्या अडीअडचणींना धावून जात. परस्परांना निरपेक्ष मदत करत. त्यांच्यात छुपे हेवेदावे, असुया, द्वेष, सुप्त स्पर्धाही असे. परंतु त्यापायी कुणाला संपवण्याची भाषा कधीच केली जात नसे. ते सारं तात्पुरतं असे.
‘just हलकंफुलकं’मध्ये चाळीतल्या अशा काही नगांच्या एकमेकांबरोबरच्या कडू-गोड संबंधांचं चित्रण आहे. पात्रांच्या नावांतूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रकट होतं. गजाभाऊ मंगोलियन. नाटकातले सूत्रधार. अविवाहित, विनापाश गृहस्थ. सर्वाच्या मदतीस धावून जाणारे. त्यांच्या विचित्र आडनावामुळे त्यांची जात कुणाला कळत नाही. तेही जातपात न मानणारे. दुसरे : मानमोडे. सदा धगधगत्या अंगारासारखे संतप्त. ‘कवटी’शिवाय साधं वाक्यही न बोलणारे. अहंतेचा महामेरू. त्यांची मुलगी शालू. वरचा मजला रिकामा असलेली. बापासारखीच आगाऊ. ती ढेकणेंच्या डरपोक धैर्यधरच्या प्रेमात पडलीय. श्रीयुत ढेकणे हे एक बिच्चारे गृहस्थ. सतत प्रत्येक गोष्टीचा कांगावा करणारी आणि तिन्हीत्रिकाळ कसल्या ना कसल्या (नसलेल्या) आजारांनी त्रस्त असलेली त्यांची बायको जोगेश्वरीबाई! तिच्यापुढे ढेकण्यांचं काही चालत नाही. परिणामी नोकरीबरोबरच घरचंही करणं त्यांच्या नशिबी आलेलं. ढेकणेच कशाला, जोगेश्वरीबाईंवर उपचार करणारे डॉक्टरही त्यांच्यापुढे हात टेकतात. जोगेश्वरीबाई त्यांचंही ब्लडप्रेशर आणि हृदयाचे ठोके अनियमित करतात. ढेकण्यांचा दिवटा पोरगा धैर्यधर हा कसलाही कामधंदा न करता गावभर उकिरडा फुंकत फिरत असतो. ढेकण्यांच्या बॉसची बायको- साळुंब्रेकरबाई आपली ‘सर्वगुणसंपन्न’ कुरूप मुलगी धैर्यधरच्या गळ्यात बांधू इच्छित असते. पण धैर्यधर मानमोडेंच्या मूर्ख शालूच्या प्रेमात पडलाय! मात्र, आपलं हे प्रकरण घरच्यांच्या कानावर घालायची दोघांची हिंमत नाही. ते ही जबाबदारी गजाभाऊंवर सोपवतात. त्याचवेळी गजाभाऊंचा जुना कुंभार मित्र खूप वर्षांनी अचानक त्यांच्याकडे येतो आणि धैर्यधर-शालू प्रकरणात उभयतांच्या घरी जाऊन तो आगीत तेल ओततो. त्यामुळे गजाभाऊंची पंचाईत होते. मानमोडे आणि ढेकणे कुटुंबीय एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकतात. जातअस्मितेचा मुद्दा त्यात कळीचा ठरतो. गजाभाऊ या साऱ्या अडचणींतून कसा काय मार्ग काढतात, हे प्रत्यक्ष नाटकात बघणंच योग्य.
लेखक हृषिकेश परांजपे यांनी एकापेक्षा एक इरसाल नमुने या नाटकात चितारले आहेत. त्यांच्या स्वभावगत आणि जातीविशिष्ट गंडातून प्रयोग उत्तरोत्तर धमाल रंगत जातो. इतक्या ‘वल्ली’ लेखकाला एकगठ्ठा कुठं सापडल्या, कोण जाणे. त्या साऱ्यांची फर्मास मोट त्यांनी ‘just हलकंफुलकं’मध्ये बांधली आहे. शाब्दिक, प्रसंगनिष्ठ, स्लॅपस्टिक तसंच निखळ विनोदाची सारी आयुधं त्यांनी यात लीलया परजली आहेत. दिग्दर्शक गणेश पंडित यांनीही नाटकाची पिंडप्रकृती जाणून घेऊन त्यानुसारच त्याची हाताळणी केली आहे. हे अर्कचित्रांचं कोलाज आहे हे त्यांनी सदैव ध्यानात ठेवलं आहे. आणि त्यानुरूप सगळी पात्रं, त्यांचे जेश्चर-पोश्चर्स, स्वभाव, वागणं, वावरणं, व्यक्त होणं, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया अन् प्रतिक्षिप्त क्रियाही त्यांनी चपखलपणे बेतल्या आहेत. हास्यनिर्मितीची एकही संधी त्यांनी वाया दवडलेली नाही. मुख्य म्हणजे प्रत्येक पात्राचा त्यांनी स्वतंत्रपणे विचार केलेला आहे. पात्रांचं बाह्य़रूप, त्याचं वागणं-बोलणं, स्वभाव, लकबी, चालणं, शरीराची ठेवण या सर्वाचा त्यांनी अत्यंत तपशिलांत विचार केल्याचं जाणवतं. या नाटकात कलाकारांना एकाच वेळी विविध भूमिका साकारायच्या असल्यानं प्रवेशागणिक निरनिराळ्या पात्रांच्या मानसिकतेसह सर्वागीण बदल त्यांना आत्मगत करायचे आव्हान पेलायचे होते. यातल्या ताकदीच्या कलाकारांनी ते समर्थपणे पेललं आहे. हाच या नाटकाचा ‘यूएसपी’ (युनिक सेलिंग पॉइंट) होय.
नाटकाचं अनेकस्थळी सूचक नेपथ्य विशाल-हर्षद यांनी साकारले आहे. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेनं नाटय़ात्मक क्षण उठावदार केले आहेत. अभिजीत पेंढारकरांच्या पाश्र्वसंगीतानंही त्यात मोलाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक पात्राचं वेगळेपण अधोरेखित करण्यात सोनल खराडेंच्या वेशभूषेचाही महत्त्वाचा वाटा आहे. ‘just हलकंफुलकं’मध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी आहे रंगभूषाकाराची. सचिन वारीक आणि चंदर पाटील यांनी रंगभूषेच्या जादूने यातल्या पात्रांना भूमिकेनुसार यथार्थ रूप प्रदान केलं आहे. त्यांचं कौशल्य हे, की पाठोपाठच्या प्रवेशांत तेच कलाकार वेगवेगळ्या पात्राच्या रूपात येत असल्यानं अत्यंत अल्प वेळात ही कसरत त्यांना जमवावी लागली आहे आणि त्यांनी ती सफाईनं पार पाडली आहे.
‘just हलकंफुलकं’तील तिन्ही कलाकारांनी वैविध्यपूर्ण पात्रं रंगविली आहेत. त्यातल्या त्यात सूत्रधार झालेल्या भारत गणेशपुरेंना ही सर्कस थोडी कमी करावी लागलीय, इतकंच. सूत्रधार गजाभाऊ मंगोलियन आणि जोगेश्वरीबाईंच्या सतराशे साठ मूर्ख प्रश्नांनी संत्रस्त झालेले डॉक्टर या दोन भूमिकांत ते सहजगत्या वावरले आहेत. या नाटकात सर्वाधिक कसोटी लागली आहे ती अनिता दाते आणि सागर कारंडे या कलावंतांची. अनिता दाते यांनी कांगावखोर जोगेश्वरीबाईंचं व्यक्तिमत्त्व अक्षरश: जिवंत केलं आहे. असलं अस्सल बेणं साकारणं येरागबाळ्याचं काम नव्हे. न्हावीकामातील संकल्पना व प्रतीकांचा आपल्या बोलण्यात सढळ वापर करणारी गावरान स्त्री, कसलाच पाचपोच नसलेली उनाड शालू तसेच सोकॉल्ड मॉड अन् श्रीमंतीचा तोरा मिरवणारी साळुंब्रेकरबाई अशा परस्पभिन्न भूमिकांचं आव्हान त्यांनी उत्तमरीत्या पेललं आहे. प्रत्येक पात्राचं त्यांचं बेअरिंग लाजवाबच. सागर कारंडे यांनी एक अभिनेता म्हणून आपलं चतुरस्रत्व याआधीच सिद्ध केलेलं आहे.
‘just हलकंफुलकं’मध्ये त्यांच्या या हरहुन्नरी व्यक्तित्वाचा पुरेपूर वापर दिग्दर्शकानं केलेला आहे. हेकट, शीघ्रकोपी मानमोडे; शामळू, कणाहीन ढेकणे; पाताळयंत्री कुंभार-नेता आणि भित्रा धैर्यधर अशा नाना छटांच्या भूमिका त्यांनी ज्या नजाकतीनं वठवल्या आहेत त्याला तोड नाही. कुठल्याही भूमिकेतील मॅनरिझम्सची सरमिसळ होऊ न देता त्या सिद्ध करणं, खरंच अलौकिक! सध्या मराठी रंगभूमीवर विनोदवीरांचा सुकाळू झालेला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते सगळेच उत्तम दर्जाचे विनोदी कलावंत आहेत. सागर कारंडे अशांपैकीच एक. अभिनयाची सूक्ष्म जाण, पात्राच्या अंतरंगात शिरण्याची हातोटी आणि विनोदनिर्मितीतील जबर हुकूमत यामुळे त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही.   
तेव्हा निखळ आणि उत्तम दर्जाच्या निखळ करमणुकीसाठी ‘just हलकंफुलकं’ पाहणं must च!