जवळपास १७ वर्षांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओमुळे एक सुंदर मुलगी बरीच प्रसिद्ध झाली. या मुलीच नाव आहे शेफाली जरीवाला. जुन्या गाण्याचे रिमिक्स करून तयार करण्यात आलेले ‘कांटा लगा..’ हे गाणे त्यावेळी सर्वांच्याच आवडीचे झाले होते. डिस्कोपासून पार्ट्यांपर्यंत तसेच अगदी हळदी समारंभातही हे गाणं वाजवलं जायचं. या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्ध झाली आणि तिला लोक ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखू लागले. तिच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शेफाली बिग बॉसच्या माध्यमतातून लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे.

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या या शोचे १३ वे पर्व सुरु असुन यात शेफालीची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. खरं तर, २९ ऑक्टोंबरलाच तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. येत्या काही दिवसात तो भाग टीव्हीवर प्रदर्शित केला जाईल. दरम्यान या नव्या स्पर्धाकाला पाहण्यासाठी बिग बॉसचे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

शेफालीने गाण्याचा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या तालावर नाचायला, गायला भाग पाडले होते. तिच्या सौंदर्यावर तर अनेकजण घायाळ झाले होते. यानंतर ती सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात आयटम साँग करताना दिसली. ‘बुगी वुगी’, ‘नच बलिये ५’ आणि ‘नच बलिये ७’ या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती.

‘मीत ब्रदर्स’ या प्रसिद्ध गायक जोडीतील हरमीत गुलजार याच्याशी तिने लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. हरमीत तिला मारहाण करायचा अशी तक्रार तिने पोलिसांकडे त्यावेळी केलेली. त्यानंतर अभिनेता पराग त्यागीला ती डेट करत होती. पराग आणि शेफाली ‘नच बलिये’च्या एका पर्वातही झळकले होते. जवळपास चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केल्याचेही वृत्त गेल्यावर्षी आले होते.