२००३ मध्ये प्रेक्षकांवर एका गाण्याची जादू पाहायला मिळाली होती. ते गाणे म्हणजे ‘अल्लाह के बंदे’. सुफि संगीताचा बाज असलेल्या गायक कैलाश खेरला नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान म्हणून केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची यादी नुकतीच समोर आली आहे. त्यामध्ये गायक कैलाश खेरच्या नावाचाही समावेश आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर कैलाश खेरने त्याचा आनंद शब्दांत व्यक्त केला आहे. हा एक अभिमानास्पद आणि आनंदाचा क्षण आहे से म्हणत त्याने आनंद व्यक्त केला.

संगीत क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कैलाश खेरला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘देवाच्या कृपेने मला हा पुस्कार मिळाला आहे. हा बहुमान मिळाला आहे. हा एक अभिमानास्पद क्षण आहे. मी आजवर केलेले कष्ट, माझ्यासोबत असलेले माझ्या आईवडिलांचे आणि गुरुंचे आशिर्वाद, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रेम यामुळेच आज हे शक्य झाले आहे’, असे कैलाश खेर म्हणाला.

पद्म पुरस्कारांसाठी वर्णी लागल्यानंतर हा आनंद कसा साजरा करणार असे विचारले असता कैलाश खेर म्हणाला, ‘सध्यातरी मी माझ्या कामात व्यग्र आहे. मला जेव्हा पुरस्कार मिळाल्याचे समजले तेव्हाही मी रेकॉर्डींगमध्येच व्यग्र होतो’. पद्म पुरस्कारांसाठी यंदा गायक कैलाश खेरसोबतच गायिका अनुराधा पौडवाल, शेफ संजीव कपूर, क्रिकेटपटू विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्म पुरस्कारांच्या निवडीसाठी यावेळी वेगळी पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. केंद्र सरकारने मागील वर्षी मे महिन्यात ऑनलाईन पद्धतीने पद्म पुरस्कारांसाठीचे कौल मागवले होते. यात मिळालेल्या तब्बल ५,००० प्रवेशिकांमधून डिसेंबर महिन्यात ५०० नावं अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली. क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करून देशाचे नाव उंचावणाऱया मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, संजीव कपूर, विराट कोहली, दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांच्यासोबतच पॅरालिम्पिकपटू मरियप्पन थांगवेलू यालाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.