‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘एक थी डायन’ चित्रपटातील आपल्या लक्षवेधी अभिनयानंतर आता कल्की कोचलिन दिग्दर्शक सोनाली बोसच्या ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ चित्रपटात मेंदुला झालेल्या पक्षाघाताने व्हिलचेअरला खिळून राहिलेल्या तरुणीची आव्हानात्मक भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील तिची ही व्यक्तिरेखा अतिशय प्रेमळ, प्रतिभावान आणि प्रेमाची अनुभुती घेण्यासाठी कोणत्याही अडथळ्यावर मात करणारी अगदी व्हिलचेअरलासुद्धा अडथळा न होऊ देणाऱ्या तरुणीची आहे. याविषयी बोलताना कल्की म्हणाली, जेव्हा सोनालीने मला ही कथा ऐकवली, तेव्हा मला ती खूप आवडली, नंतर या कथेची ‘सनडान्स रायटर्स लॅब’मध्येदेखील वर्णी लागली. याआधीचा तिचा ‘अमू’ हा चित्रपट मी पाहिला आहे, जो अतिशय वास्तव आणि दमदार आहे. चित्रपटातील मेंदुच्या पक्षाघाताने आजारी असलेल्या तरुणीची शारीरिक हालचाल आणि बोलण्यातील विशिष्टपणा दर्शविण्यासाठी कल्की कोचलिन कमालीची मेहनत घेत आहे. यासाठी ती फिजिओथेरपिस्ट आणि स्पिचथेरपिस्ट यांची मदत घेते आहे. याशिवाय शारीरिक हालचाली आणि बोलण्याची ढब यात अधिक अचूकता आणण्यासाठी अदिल हुसेन यांच्या नाट्यकार्यशाळेत सराव करते आहे. या विषयी बोलताना कल्की म्हणाली, सतत व्हिलचेअरवर बसणे ही सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे. चित्रीकरणास सुरूवात होण्याआधीच चित्रीकरणादरम्यान जास्तीत जास्त वेळ व्हिलचेअरवर बसण्याचा निर्धार मी केला होता. परंतु याचा माझ्या शरीरावर परिणाम झाला, खास करून पाठीवर. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या माझ्यासाठी हे फार कठीण होते. याशिवाय एक (आकंठ प्रेमात बुडालेले) अतिशय इंटिमेट असे प्रेमाचे दृष्य साकारायचे होते, जे माझ्यासाठी फार कठीण होते.
कल्की तिच्या आगामी चित्रपटांसाठी कमालिची उत्सुक आहे. राज निदिमोरु आणि क्रिश्ना डी. के. यांच्या ‘हॅपी एन्डिंग’ चित्रपटात ती विशाखा नावाच्या तरुणीची भूमिका करत आहे. जी अतिशय वेंधळी आणि आपल्या प्रियकरावर सतत अधिकार गाजवणारी अशी आहे. यात सैफ अली खान तिच्या प्रियकराची भूमिका साकारत आहे. ही विनोदी व्यक्तिरेखा साकारताना कल्कीने खूप धमाल केली. या वर्षाच्या उत्तरार्धात प्रदर्शित होणाऱ्या ‘जिया और जिया’ चित्रपटात ती जिया अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट इतरांपासून लपवून जीवनाचा पुरेपुर आनंद भोगत असणाऱ्या तरुणीच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. याशिवाय कल्की नाटकांमध्ये काम करण्यातदेखील व्यस्त आहे. सध्या ती अजय क्रिश्ना यांच्या ‘ट्रायवल डिझास्टर’ या अतुल कुमार दिग्दर्शित नाटकात काम करत आहे. ज्याचे एक महिनाभर अमेरिकेत सर्वत्र प्रयोग सादर केले जाणार आहेत. याशिवाय जून महिन्यात ती रजत कपूरच्या ‘हॅमलेट दी क्लॉन प्रिन्स’ आणि टागोर यांच्या कथेवर आधारीत ‘कलरब्लाईंड’ या मनव कौल यांच्या नाटकात काम करत आहे. येणाऱ्या काळात कल्की कोचलिनकडून काही प्रगल्भ भूमिका पाहायला मिळतील असे वाटते.