राजकुमार राव आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेला ‘मेंटल है क्या?’ या चित्रपटाच्या शीर्षकावरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टििफकेशनने (सीबीएफसी)’ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत निर्मात्यांकडे शीर्षक बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला असून हा चित्रपट आता नव्या नावाने प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘मेंटल है क्या?’ हे शीर्षक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी भेदभाव करणारे आणि हिणवणारे असल्याची तक्रार भारतीय मनोचिकित्सा संस्थेने केली होती. त्यानंतर या शीर्षकामध्ये बदल करण्यात आला आहे. आता या चित्रपटाचं नाव ‘जजमेंटल है क्या?’ असं करण्यात आलं आहे.

‘जजमेंटल है क्या?’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांसाठी वादामध्ये सापडत आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या नावावर अनेकांनी टीकाही केली होती. यावर सीबीएफसीने आक्षेप घेत चित्रपटाचं नाव बदलण्याची सूचना दिली. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, चित्रपटामध्ये काही बदल केल्यानंतर सीबीएफसीनं ‘जजमेंटल है क्या?’ या चित्रपटाला यूए सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनातील मार्ग मोकळा झाला असून हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.