अभिनेत्री कंगना रणौतचा पर्सनल बॉडीगार्ड कुमार हेगडे याच्याविरुद्ध बलात्कार आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुमार हेगडेवर लग्नाचं आमिष दाखवून अनेकवेळ जबरदस्ती बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि ५० हजार रुपये घेतल्याचा केल्याचा आरोप आहे.

सातत्याने आपल्या भूमिकांमुळे वादात सापडणारी अभिनेत्री कंगना रणौतचं नाव तिच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल झाल्यानं चर्चेत आलं आहे. कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोप करणारी महिला मुंबईत मेकअप आर्टिस्टचं काम करते. तक्रारकर्त्या महिलेची वैद्यकीय चाचणी आणि तक्रार प्राप्त झाल्यानंतर डीएन नगर पोलिसांनी १९ मे रोजी रात्री गुन्हा नोंदवला.

फिर्यादी महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार कुमार हेगडे (कंगनाचा बॉडीगार्ड) तिला २०१३ मध्ये भेटला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये हेडगेने तिला प्रपोज केलं. तिने होकार दिल्यानंतर हेगडे अधूनमधून तिच्या फ्लॅटवर यायचा आणि बळजबरीने तिच्याशी संबंध ठेवायचा. अनेकवेळा त्याने जबरदस्ती केली. २७ एप्रिल रोजी हेगडे आपल्या घरातून ५० हजार रुपये घेऊन पळाल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

यानंतर कुमार हेगडेच्या आईने लग्नासाठी आपल्या मुलाला (कुमार हेगडेवर) जबरदस्ती करून नको म्हणून पीडित महिलेला धमकी दिली होती, असंही माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कंगनाकडे काम करणाऱ्या हेअर स्टायलिस्ट ब्रॅण्डन अॅलिस्टर दी घी वर एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.