‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेला अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. मात्र आता या चित्रपटातील अभिनेता चेतन कुमार अंहिसा याने धार्मिक भावना दुखावल्या आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कांतारा’ हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता त्यावरुन वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात कन्नड अभिनेता चेतन कुमार अहिंसा याने कांतारा या चित्रपटातील ‘भूत कोला’ या परंपरेबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. एका हिंदू संघटनेने चेतन अंहिसाच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
आणखी वाचा : Kantara Movie Review : आपल्या परंपरेला आणि लोककलेला अभिमानाने जगासमोर सादर करणारा ‘कांतारा’

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हिंदू धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चेतनविरुद्ध कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या भूत कोला या परंपरेबद्दल असलेल्या संवादावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे त्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या असा आरोप करण्यात आला होता.

हिंदू जागरण वेदिका या संस्थेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. भूत कोला हे कर्नाटकातील दैवी ग्रामीण प्रथेवर आधारित या चित्रपटाबद्दल वादही सुरु आहे.

चेतन अंहिसा काय म्हणाला होता?

चेतन अंहिसा यांनी ‘कंतारा’चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्या विधानावर एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावर तो म्हणाला होता, भूत कोला ही परंपरा हिंदू धर्माचा भाग नाही. हिंदू धर्माच्या अस्तित्वात येण्यापूर्वी ती प्रथा सुरु होती. त्यामुळे ज्याप्रमाणे हिंदू भाषा ही कोणावर लादता येत नाही. त्याचप्रमाणे हिंदुत्वही कोणावर लादता येत नाही. भूत कोला ही देशातील मूळ रहिवाशांची परंपरा आहे. ती हिंदू धर्मात येणार नाही.

आणखी वाचा : “हा चित्रपट…” ‘कांतारा’ पाहिल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबरला त्याच्या मूळ कन्नड या भाषेत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. सध्या या चित्रपटाने जगभरात १७० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १७ कोटींची कमाई केली आहे. याला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाला तेलुगू आणि हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला.