सैफची बेगम म्हणजेच बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर ही डिसेंबरमध्ये गोड बातमी देणार असल्याचे आतापर्यंत त्यांच्या चाहत्यांना कळलेही असेल. सैफने त्यांच्या घरी बाळाचे आगमन होणार असल्याचे सांगितल्यानंतर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, यामुळे आता करिना काही काळासाठी रुपेरी पडद्यावरून गायब होणार आहे.
करिना गरोदर असल्याच्या बातमीला दुजोरा देत सैफ म्हणाला की, मी आणि माझी पत्नी लवकरचं आमच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहोत. आमच्या सर्व चाहत्यांचे आणि शुभेच्छुकांचे आम्ही आभारी आहोत. दरम्यान, करिनाच्या खिशात सध्या ‘विरे दी वेडिंग’ हा एकमेव चित्रपट आहे. या चित्रपटात करिनासोबत स्टाइल दीवा सोनम कपूरदेखील झळकणार आहे. टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, करिनाने या चित्रपटाचे शूटींग सप्टेंबरपूर्वी संपवण्यास सांगितल्याचे कळते. त्याचसोबत आता रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्यातील वाद मिटला असून ते ‘गोलमाल ४’वर काम करत आहेत. गोलमालच्या आधिच्या दोन सिक्वलमध्ये करिनाने काम केले होते. पण आता पुढच्या सिक्वलमध्ये करिना तिच्या चाहत्यांना दिसणार नाही. करिनाने यावर्षी ‘उडता पंजाब’ आणि ‘की अॅण्ड का’ हे चित्रपट केले होते. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या बड्या अभिनेत्रींनी आता हॉलीवूडमध्येही नाव कमाविले आहे. मात्र, आपल्याला अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसल्याचे करिनाने म्हटले होते. याविषयी बोलताना करिना म्हणाली होती की, मी खूप वेगळ्या गोष्टींना प्राधान्य देते. प्रियांकाचे काम हे कौतुकास्पदचं आहे. मी असे काही करू शकेन असे मला वाटत नाही. मला एक काम करणारी विवाहीत स्त्री बनायचे होते. माझ्या जबाबदा-या या त्यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत. माझं लग्न झालंय आणि आता मला कुटुंब विस्ताराचा विचार करायचा आहे, असेही करिना म्हणाली होती.
करिना कपूर ही सैफची दुसरी पत्नी आहे. या दोघांनी २०१२ साली विवाह केला होता. सैफला पहिली पत्नी म्हणजेच अमृता सिंगपासून दोन मुले आहेत.