मनोरंजनासोबतच माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणार शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती (केबीसी)’ पर्व ११. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन करत असून शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये येणारे स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील अनुभव शेअर करतात. दरम्यान अनेक वेळा ते भावूक झाल्याचे पाहायला मिळते. तसेच अमिताभ बच्चन देखील शोमध्ये त्यांच्या आयुष्यातील काही किस्से शेअर करताना दिसतात.

नुकताच शोमध्ये राजस्थानमधील पंकज महेश्वरी यांनी स्पर्धक म्हणून हजेरी लावली. त्यांनी गेम खेळताना अमिताभ यांच्याशी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. दरम्यान अमिताभ यांनी पंकज यांना जिंकलेल्या पैशाचे काय करणार असा प्रश्न देखील विचार होता. त्यावर त्यांनी रंजक उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : शरद पवारांना आरे तुरे काय करता? जितेंद्र जोशी संतापला

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर पंकज बसले असल्याचे दिसत आहे. दरम्यान अमिताभ पंकज यांना जिंकलेल्या रक्कमेचे काय करणार असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यावर पंकज यांनी ‘माझ्या वडिलांची चहाची टपरी आहे. मी जिंकलेल्या रक्कमेतून त्याचे हॉटेल करण्याचा प्रयत्न करेल आणि उरलेली रक्कम मोठ्या काकांना देणार’ असे म्हटले आहे. पंकज यांची ही इच्छा ऐकून अमिताभ खूश होतात आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडात पंकज यांचे कौतुक केले.

पंकज यांनी शोमध्ये बुद्धीमत्तेच्या जोरावर तीन लाख वीस हजार रुपयांची रक्कम जिंकली आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पंकज यांनी ऑडियन्स पोल ही लाइफलाईन वापरी. पंकज यांची इच्छा ऐकून अनेकजण प्रेरित झाले असल्याचे दिसत आहे.