गायन आणि अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर संगीतकाराच्या रूपात समोर आलेली केतकी माटेगावकर सध्या चांगलीच प्रकाशझोतात आहे. केतकीच्या कलागुणांची चर्चा आता साता समुद्रापार पोहोचली आहे. गायन आणि अभिनयाच्या बळवर प्रेक्षकांना मोहिनी घालणारी केतकी परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांचे कान तृप्त करण्यासाठी सध्या परदेश दौऱ्यावर आहे. तिची आई सुवर्णा माटेगावकरदेखील तिच्या सोबत आहे.

अमेरिकेत मुक्कामी असलेली केतकी ‘वेड लागले प्रेमाचे’ या संगीतरजनी अंतर्गत आपल्या गाजलेल्या गाण्यांचा नजराणा सादर करत संगीतप्रेमींचे कान तृप्त करत आहे. ९ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात ती अमेरिकेतील वेगवेगळया शहरांमध्ये ‘वेड लागले प्रेमाचे’ कार्यक्रमाचे शो करणार आहे. चार्लोट, फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क, अटलांटा, डेट्रॉइट, डल्लास, ऑस्टिन, लॉस एंजेलिस तसेच सॅन फ्रॅन्सिस्को येथे हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमांच्या संगीत संयोजनाची जबाबदारी केतकीचे वडील पराग माटेगावकर सांभाळत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केतकीने आजवर केवळ मराठी चित्रपटांमध्येच अभिनय केला असला, तरी अमराठी प्रेक्षकांनाही तिच्या गाण्यांनी वेड लावलं आहे. केतकीची गाणी केवळ भारतातीलच संगीतरसिकांचे कान तृप्त करीत नाहीत, तर दूर देशी वसलेल्या अनिवासी भारतीयांनाही आपलीशी वाटतात. परदेशातील रसिकांचे कान प्रत्यक्षात तृप्त करण्यासाठी केतकीची ही परदेशवारी आखण्यात आली आहे. मी केवळ माझं काम करते. संगीताची सेवा करणं हे माझं परम कर्तव्य आहे. रसिक मायबापांना माझं काम आवडतं, यातच मी स्वतःला धन्य मानते. भारतीय प्रेक्षकांइतकेच परदेशात स्थायिक झालेले भारतीयदेखील माझ्या गीत-संगीत-अभिनयावर प्रेम करतात. त्यांनाही माझ्या गायनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची इच्छा असते. त्यामुळेच अशा प्रकारच्या परदेश दौऱ्याचं आयोजन केलं जातं, दौऱ्याचं महत्व अधोरेखीत करताना केतकी म्हणाली. या युएस दौऱ्याच्या आयोजनात तिथल्या भारतीयांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यांनी केलेल्या उत्तम आयोजनामुळे तसंच प्रेमामुळेच परदेशात जाऊन मी माझ्या मातीतील म्हणजेच मराठी गीतांचा कार्यक्रम करू शकतेय. भविष्यात खूप काही करायचं आहे. पण सर्वप्रथम गीत-संगीताची सेवा करायची आहे. माझ्या तसंच ‘वेड लागले प्रेमाचे’ या शो च्या माध्यमातून आजच्या काळातील मराठी गाणी आज परदेशात पोहोचत असल्याचा मला अभिमान असून आनंदही होत आहे, असा शब्दांत केतकीने भावना व्यक्त केल्या.