दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजीवी याने तब्बल १० वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. चिरंजीवीचा ‘कैदी नंबर १५०’ हा चित्रपट मंगळवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू चालविण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि अमेरिकन बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार ‘कैदी नंबर १५०’ चित्रपटाने केवळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एक मिलियन डॉलरपेक्षाही अधिक कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा विक्रम केला आहे.

‘कैदी नंबर १५०’ने प्रदर्शित होण्यापूर्वी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अमेरिकन बॉक्स ऑफिसवर ६१५,००० डॉलरची कमाई केली. या चित्रपटाचे वितरक असलेल्या क्लासिक एन्टरटेमेंन्ट या कंपनीने यांसबंधीचे ट्विट केले आहे. ‘कैदी नंबर १५०’ने केलेल्या कमाईची ‘बॉस इज बॅक’ असे म्हणत सर्वच चित्रपट समीक्षकांनी प्रशंसा केली आहे.

‘कैदी नंबर १५०’ या चित्रपटासंबंधीची उल्लेखनीय बाब म्हणजे आखाती राष्ट्रांच्या अनेक बांधकाम कंपन्या आणि इतर सर्वच प्रकारच्या कंपन्यांनी या चित्रपटासाठी जाहीर सुट्टीची घोषणा करण्यात आली होती. अभिनेता चिरंजीवीची मुख्य भूमिका असणारा ‘खिलाडी नं. १५०’ हा चित्रपट भारतासह आखाती राष्ट्रांमधील जवळपास ५०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, ‘दुबई’ चिरंजीवी फॅन असोशिएशन’चे अध्यक्ष ओरुंगति सुब्रमण्यम शर्मा यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले होते की, ‘आम्ही नोवो चित्रपटगृहामध्ये ११ जानेवारीच्या पहिल्या शोचीसुद्धा सर्वच तिकीटे बुक केली आहेत’. सौदी अरबमध्ये जरी एकच चित्रपटगृह असले तरीही उर्वरित सर्वच आखाती राष्ट्रांमध्ये चिरंजीवीचा हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रियादच्या बांधकाम कंपनीतील एका कामगाराच्या म्हणण्यानुसार ‘हा क्षण आमच्यासाठी एका सणाप्रमाणेच आहे. आम्हा सर्वांचा आवडता अभिनेता १० वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. या क्षणाची आम्ही गेल्या बऱ्याच काळापासून वाट पाहात होतो’. या सुपरहिट अभिनेत्याचा हा १५० वा चित्रपट असल्यामुळे आखाती राष्ट्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.