मराठी अभिनेते किरण माने यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचं माने यांचं म्हणणं आहे. त्यावरून मोठा गदारोळ सुरू आहे. अशातच माने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याच्याही चर्चा होत्या. माने यांनी आज पवार यांची भेट घेतली आणि त्यांना आपली बाजू ऐकवली. "साहेबांसमोर फक्त खरा माणूस बसू शकतो", अशा शब्दांत माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांशी दीड तास चर्चा केल्यानंतर किरण माने यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना म्हणाले, "एक अभिनेता जो मनापासून काम करतो, काही त्रास न देता काम करतो, त्याला अचानक काढणं..कारणसुद्धा दिलं नाही, त्याची बाजू मांडू न देता काढणं हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. जर याविरोधात आवाज उठवायचा तर तो कोणाकडे? तर आपल्याकडे एक आणि एकच नेता आहे जो खूप संवेदनशील आहे, विचारी, विवेकी आहे आणि सांस्कृतिक क्षेत्राची माहिती असलेला आहे, तो म्हणजे शरद पवार. दुसरं मला कोणी दिसत नाही आणि ते उदासिन राहून सगळं ऐकू शकतात. म्हणून मी माझी बाजू तिकडे घेऊन गेलो. माझी बाजू म्हणजे मी आत्ता जे म्हणतोय, मला जे कळलं चॅनेलच्या माणसाकडून की राजकीय भूमिका वगैरे. तर त्यासंदर्भात मी त्यांच्याशी बोललो. राजकीय भूमिकेसंदर्भातली सगळी कागदपत्रं मी त्यांना दाखवली. त्यावर मला आधी आलेल्या धमक्या, पोस्ट्स हे सगळं दाखवलं. माझ्या दृष्टीने मी समजावून सांगितलं". हेही वाचा - लोकसत्ता विश्लेषण: अभिनेता किरण माने अचानक चर्चेत का आलेत? ‘राजकीय भूमिकेचं प्रकरण’ आहे तरी काय? माने पुढे म्हणाले, "आता महिलेने तक्रार केली म्हणजे आपल्याला धक्का बसतो. तर तसं काही नाही धक्का बसण्यासारखं. त्या तक्रारीबद्दलची कागदपत्रंही मी पवारांकडे सादर केली. माझी बाजू त्यांना बोलून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतली. बघू आता ते काय करतायत त्याच्यावर. मला त्यांच्याकडे दाद मागावीशी वाटली". शरद पवार यांनी हे ऐकल्यावर काय प्रतिक्रिया दिली हे सांगताना किरण माने म्हणाले, "प्रतिक्रिया लगेच देतात ते लोक फार उथळ असतात. साहेब त्यातले नाहीत. ते शांतपणे सगळं ऐकून घेतात. त्यांचे प्रश्न फार खोचक असतात. साहेबांच्या समोर फक्त खरा माणूसच बसू शकतो, खोटा माणूस बसू शकत नाही. ते दोन-तीन असे खोचक प्रश्न विचारतात त्यातून माणूस कुठं आहे हे कळतं. त्यामुळे त्यांनी मला प्रश्न विचारले, मी त्यांची प्रामाणिकपणे उत्तरं दिली. साहेब थोडा विचार करतील. दुसरी बाजूही समजून घेतील आणि मग बघू ते काय निर्णय देतायत".