सध्या चित्रपटगृहात दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांचा ‘ठग लाईफ’, अक्षय कुमार आणि मोठमोठ्या कलाकारांच्या भूमिका असलेला ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांचे खेळ सुरू असताना तीन – तीन मराठी चित्रपटांचे खेळ होत आहेत, याकडे प्रसिद्ध अभिनेते, कवी किशोर कदम यांनी लक्ष वेधले. त्यांची भूमिका असलेल्या ‘जारण’ या मराठी चित्रपटाला सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याच वेळी त्यांची मुख्य भूमिका असलेली ‘अंधारमाया’ ही वेबमालिकाही ‘झी ५’वर उत्तम सुरू आहे, त्यानिमित्ताने बोलताना, ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’, ‘एप्रिल मे ९९’ आणि आता ‘जारण’ हे चारही वेगळ्या आशय-विषयावरचे मराठी चित्रपट चित्रपटगृहातून अजूनही सुरू आहेत. त्यांच्या खेळांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कमल हसन, अक्षय कुमारच्या चित्रपटांची स्पर्धा असूनही हे चित्रपट भरभक्कमपणे चालले आहेत, अशा शब्दांत किशोर कदम यांनी मराठी चित्रपटांचे कौतुक केले.

‘चांगला आशय असलेले चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आपोआप चित्रपटगृहाकडे ओढला जातो. गेल्या काही महिन्यांत आलेल्या मराठी चित्रपटांनी हे सिद्ध केलं आहे. दाक्षिणात्य भाषा कळत नसतानाही प्रेक्षक आवर्जून ते चित्रपट पाहतात, तशाच पद्धतीचे दर्जेदार मराठी चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले आहेत’ असे ते म्हणाले.

प्रेक्षक आहेत म्हणूनच…

‘चांगल्या चित्रपटांसाठी आवश्यक असलेले आशय, दिग्दर्शकीय कौशल्य, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत हे सगळे घटक आत्ताच्या मराठी चित्रपटांमध्ये आहेत, त्यामुळे हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येत आहेत. एरव्ही आपण मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षक येत नाहीत, अशी ओरड करतो. पण आता प्रेक्षक चित्रपट पाहायला जात आहेत, म्हणूनच हे चार चित्रपट उत्तम चालले आहेत. त्यामुळे चित्रपट आशयघन असेल तर प्रेक्षक ते पाहायला येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्यामुळे प्रेक्षक घाबरतील अशी भूमिका… ‘अंधारमाया’ या वेबमालिकेत किशोर कदम यांनी केलेली गोण्याची भूमिका ही त्यांच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा का वेगळी आहे, हे सांगताना त्यांनी आजवरच्या त्यांच्या विविध भूमिकांचा उल्लेख केला. ‘मी आजवर वैविध्यपूर्ण भूमिकाच केल्या आहेत. ‘फँड्री’मधला व्यथित असणारा, स्वत:चं जगणंच नसणारा दलित समाजातील माणूस, ‘नटरंग’मधला तमाशातला काहीसा लबाड स्वभावाचा, त्याच्यातलं माणूसपण जिवंत आहे की नाही अशा मधल्या अवस्थेतला माणूस, ‘जोगवा’मधला साडी नेसणारा पुरुष आणि स्त्री या दोन्ही भावनांमध्ये अडकलेला माणूस, ‘दिठी’मध्ये देवावरून विश्वास उडालेला वारकरी अशा विविधांगी भूमिका मी केल्या आहेत. पण ज्याच्यामुळे प्रेक्षक घाबरतील, अशी व्यक्तिरेखा आजवर माझ्या वाट्याला आलेली नव्हती. भयाची भावना प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल, अशी व्यक्तिरेखा मी केली नव्हती.

एरव्ही दैनंदिन आयुष्यात मी कुठे शांत वाचत बसलो असेन तर अनेकदा हा तुसडा किंवा रागीट आहे असा लोकांचा समज होतो. माझ्याशी बोलल्यावर मात्र मी तसा रागीट नाही हे त्यांच्या लक्षात येतं. कदाचित माझ्या दिसण्यामुळे लोकांना तसं वाटत असावं. माणसाच्या दिसण्याचा आणि त्याच्या स्वभावाचा संबंध नसतो, तशीच ‘अंधारमाया’मधली गोण्या ही व्यक्तिरेखा आहे. तो जसा दिसतो आहे, तसा तो खरंच आहे का? असेल तर तो असा का बनला आहे? असे अनेक पदर त्या व्यक्तिरेखेला होते. ते मला खूप आवडलं आणि म्हणून मी ‘अंधारमाया’मधील ही व्यक्तिरेखा केली’.

कलाकार भूमिकेवर विश्वास ठेवतो…

‘अंधारमाया’ ही वेबमालिका आणि ‘जारण’ हा चित्रपट, या दोन्हींची कथा ही काही प्रमाणात श्रद्धा-अंधश्रद्धा आणि विज्ञानवाद या दोन्हींच्या हिंदोळ्यावर झुलणारी आहे. प्रेक्षकांना पटेल अशा ताकदीने या भूमिका करताना काय विचार असतो? याबद्दल बोलताना मुळात कलाकाराचा जर त्यावर विश्वास बसला नाही तर तो प्रेक्षकांचाही त्या भूमिकेवर विश्वास बसणार नाही, असं मत किशोर कदम यांनी व्यक्त केलं. कलाकाराचा वैयक्तिक विश्वास असो वा नसो, त्या त्या घटनेपुरता, व्यक्तिरेखेपुरता, नाटकापुरता वा त्या भूमिकेपुरता कलाकाराला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. आणि ते खरेपणाने साकारण्यासाठी प्रत्येक कलाकाराने आपली एक प्रक्रिया विकसित केलेली असते. कोणी आतून बाहेर जातो, तर कोणी बाहेरून आत… असं सांगतानाच त्यांनी सविस्तरपणे कलावंताची भूमिकेच्या तयारीची भिन्न पद्धत वर्णन करून सांगितली. ‘आधी आत जातो म्हणजे त्या व्यक्तिरेखेच्या कुठल्या गोष्टी आपल्या स्वत:त दडलेल्या आहेत, ते शोधण्याचा प्रयत्न करतो. आधी आतली तयारी केली की मग बाहेरून ती व्यक्तिरेखा कशी दिसेल, त्याचे कपडे, त्याच्या लकबी कशा असतील हे शोधलं जातं. तर काही कलाकार आधी त्या व्यक्तिरेखेचा लुक, तो कसा दिसत असेल, त्याचे कपडे ही तयारी करतात आणि मग त्याच्या अंतर्मनाचा लेखाजोखा मांडतात. दोन्ही पद्धती आपापल्या परीने योग्यच आहेत.

‘जारण’मधला डॉक्टर साकारताना माझा जारण-मारणावर विश्वास नाही. त्या अर्थाने मी नास्तिक आहे. पण कुठेही बाहेर जाताना मी देवाला नमस्कार करतो, दरवेळी विमानात बसताना माझं माझं काही मंत्रस्वरूप मी ठरवलेलं आहे ते मी मनातल्या मनात म्हणत असतो. मतदान करतानाही त्यातल्या त्यात बरा माणूस निवडून तो पुढे जाऊन लोकांचं काम करेल या विश्वासाने आपण मत देतो. तसंच आपल्याला आधार म्हणून सतत कशावर तरी विश्वास ठेवावाच लागतो, ते आव्हान आपल्यासमोर असतं. नटाच्या समोर त्या भूमिकेचं आव्हान असतं आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून काम करणं हे त्याचं कर्तव्य असतं. ते मी प्रत्येक भूमिकेच्या वेळी करतो’, असं त्यांनी सांगितलं.

सामाजिक विषय, मांडणी मनोरंजक

‘दाक्षिणात्य चित्रपटांमधून खूप वर्षांपासून सामाजिक विषय त्यांचं गांभीर्य न घालवता मनोरंजक पद्धतीने मांडले गेले आहेत. तिथले जुने नट, दिग्दर्शक यांची चित्रपट माध्यमावर पकड होतीच, पण त्यांची सामाजिक जाणही खूप खोल होती. एम करुणानिधी यांनी लेखक म्हणून सुरुवात केली होती, उत्तम नट झाले, पुढे ते मुख्यमंत्री झाले. तर तसे लेखक-अभिनेते, दिग्दर्शक जे स्वत: समाजात उतरून काम करणारे होते, त्यांनी चित्रपटांमधूनही सामाजिक प्रश्न मांडले. आणि गेली कैक वर्षं त्यांनी प्रेक्षकांना तशा प्रकारचे चित्रपट पाहण्याची सवय लावली, त्याची फळं त्यांच्या आत्ताच्या पिढीतील कलावंतांना भरभरून मिळत आहेत. कन्नड, तमीळ, तेलुगू कोणत्याही भाषेतला चित्रपट असो, तो सामान्यांचं जगणं त्यांना भावेल अशा पद्धतीने मांडणारा असल्यानेच प्रेक्षकांनी दाक्षिणात्य चित्रपट उचलून धरले’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मराठी चित्रपटसृष्टीत असे चित्रपट कमी प्रमाणात केले गेले, काही मोजक्या दिगर्शकांकडून आणि काही मोजक्या चित्रपटांपुरतंच असं दर्जेदार काम केलं गेलं. त्यामुळे तसे चित्रपट पाहण्याची सवय आपल्या प्रेक्षकांना लागली नाही, पण आत्ताच्या चित्रपट दिग्दर्शकांकडे ते कौशल्य आहे. लोकांना आपलेसे वाटतील असे चित्रपट आता मराठीतही येत आहेत, मागच्या एका पिढीपासून ते सुरू झालेलं आहे, त्यामुळे येत्या काळात आपल्या पुढच्या पिढीतील कलाकारांना त्याचा निश्चित फायदा होईल’, असा विचार त्यांनी मांडला.