आपल्या अभिनय कौशल्याने अनेकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. आज त्यांचा वाढदिवस आहे. डिंपल यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी झाला. वयाची साठी पार केलेली ही अभिनेत्री आजही तितकीच चर्चेत असते. वयाच्या केवळ १६व्या वर्षी डिंपल यांनी त्यांच्या अभिनय, आत्मविश्वास आणि कलागुणांच्या बळावर स्टारडम मिळवले. अशा अभिनेत्रीशी लग्न करताना राजेश खन्ना यांना चक्क त्यांच्या वयाचाही विसर पडला होता. आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या डिंपल यांच्याविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज कपूर यांची लकी चार्म

१९७२ साली राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट प्रदर्शित केला होता. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नव्हता. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले राज चिंताग्रस्त झाले होते. त्यांना लवकरात लवकर या कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडायचे होते. त्यावेळी त्यांची नजर १६ वर्षांच्या डिंपलवर पडली आणि त्यांनी मुलगा ऋषी कपूर याच्यासोबत तिला ‘बॉबी’ चित्रपटात काम दिले. हा चित्रपट तेव्हा हिट झाला. त्यामुळे डुबत्या होडीला सहारा मिळावा तशीच बॉलिवूडच्या शोमॅनची परिस्थिती झाली. डिंपल त्यांच्यासाठी लकी चार्म ठरल्या.

पदार्पणानंतर लग्न आणि नंतर ब्रेक

‘बॉबी’ च्या यशानंतर डिंपल यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या होत्या. पण, त्यांनी सर्व ऑफर्स नाकारत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.

…आणि त्यांचे लग्न तुटले

डिंपल यांच्याशी लग्न करताना राजेश खन्नांचे वय त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यांच्या लग्नाचा एक छोटासा व्हिडिओ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी दाखविला जात होता. लग्नानंतर त्या जवळपास १० वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या. त्यादरम्यान, त्यांनी ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींना जन्म दिला. त्यावेळी राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होते. राजेश खन्नांचा राग आणि चीडचीड वाढल्यामुळे त्यांचे लग्न तुटल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी तेव्हा विभक्त झाली. पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही, असेही म्हटले जाते. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये डिंपल बऱ्याचदा त्यांच्यासोबत दिसल्या.

पडद्यावर बोल्ड पदार्पण

राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळल्या. १० वर्षे ब्रेक घेऊन आणि दोन मुलांची आई असूनही १९८५ साली त्यांनी ‘सागर’ चित्रपटातून केलेले पदार्पण अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटातील त्यांच्या बोल्ड लूकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

लता मंगेशकर यांच्या हिरोईन बनल्या

‘सागर ‘ चित्रपटानंतर डिंपल बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्धीस आल्या. १९८६ मध्ये आलेला ‘जांबाज’ हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे. ‘जख्मी औरत’ हा १९८८ मध्ये आलेला चित्रपट त्यांच्या महत्त्वपूर्ण चित्रपटांमध्ये गणला जातो. यात त्या महिला इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर १९९१ मध्ये आलेला ‘लेकिन’ हा त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला. या चित्रपटाची निर्मिती गायिका लता मंगेशकर यांनी केली होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या

‘रूदाली’ (१९९३) चित्रपटातील भूमिकेसाठी डिंपल यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तेव्हा चालला नसला तरी डिंपल यांनी त्यांच्या अभिनयाने समीक्षकांची मनं जिंकण्यात यश मिवळलं होतं.

फिल्मोग्राफी

आयुष्यात उतार-चढाव पाहणाऱ्या या अभिनेत्रीने कधीच हार मानली नाही. जवळपास चार दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी ७५ चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘अर्जुन’, ‘एतबार’, ‘काश’, ‘राम लखन’, ‘बीस साल बाद’, ‘बंटवारा’, ‘प्रहार’, ‘अजुबा’, ‘नरसिंहा’, ‘गर्दिश’, ‘क्रांतिवीर’, ‘दिल चाहता है’, ‘बिइंग सायरस’, ‘दबंग’, ‘कॉकटेल’, ‘पटियाला हाउस’, ‘फाइंडिंग फॅनी’ आणि ‘वेलकम बॅक’ या चित्रपटांचा समावेश आहे. मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांच्यासोबत त्या बऱ्याचदा कार्यक्रमांना उपस्थिती लावतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about dimple kapadia journey in bollywood avb
First published on: 08-06-2021 at 14:31 IST