कमाल आर खानचे प्रत्येक ट्वीट चर्चेचा विषय ठरते. विविध विषयांवर कोणीही विचारले नसताना हा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक त्याची मते मांडताना दिसतो. सेलिब्रिटी त्याच्या ट्वीटकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकरी मात्र त्याच्या ट्वीटची आतुरतेने वाट पाहात असतात. त्याला अनेक वेळा ट्रोल करतात. आता कमाल आर खानने अभिनेता रणवीर सिंगच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत धक्कादायक दावा केला आहे.

रणवीर सिंग हा सध्याचा अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. रणवीरने आदित्य चोप्राच्या यशराज प्रोडक्शनमधील ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात रणवीरसोबत अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट त्यावेळी हिट ठरला होता. या चित्रपटाने रणवीरला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता केआरकेचा दावा आहे की रणवीर सिंगला आदित्य चोप्राने लाँच केलेले नाही तर यशराज फिल्म्स हा केवळ एक मार्ग होता.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने घेतली नागार्जुनची भेट, जाणून घ्या कारण

केआरकेने दावा केला आहे की रणवीरच्या वडिलांनी मुलाला इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्यासाठी वायआरएफला जवळपास २० कोटी रुपये दिले होते. ‘तुम्हाला असे वाटत असेल की रणवीर सिंगला यशराज फिल्म्सने लाँच केले आहे आणि आज तो एक अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तुमच्या माहितीसाठी आदित्यने रणवीरला लाँच केलेले नाही तर आदित्यच्या माध्यमातून रणवीरला लाँच करण्यात आले. रणवीरच्या वडिलांनी आदित्यला २० कोटी रुपये दिले होते आणि त्यानंतर यश राज फिल्म्सने रणवीरला लाँच केले’ असे केआरके म्हणाला.