Kunal Kamra Eknath Shinde Controversy : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर अनेक स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच आता याप्रकरणी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोलेने (Girija Oak Godbole) भाष्य केलं आहे. ‘इसापनीती’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल मत व्यक्त केलं.

यावेळी गिरिजा असं म्हणाली की, “नुकतीच आता एका ठिकाणाची तोडफोड केली आणि आणि त्यांनी असं सांगितलं की, आम्हाला आता सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत आम्ही ती जागा पुन्हा सुरू करणार नाही. तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी एका कॉमेडियनने जोक केला आणि मग एका संस्थेने त्यांच्यावर हल्ला केला. हे सगळं दुर्दैवाचं आहे. मी असं म्हणत नाही की, तुमच्या भावना कशा दुखावल्या गेल्या. भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या भावना आहेत. भावना दुखावल्या… नाही दुखावल्या… तर त्यांची ती वैयक्तिक अभिव्यक्ती आहे. पण एखाद्या जागेची तोडफोड करावी हे उत्तर आहे का? आता यावर कमेंट्स येणार आणि लोक बोलणार. पण मला खरंच असं वाटतं की, जिथे कला सादर करता येते, अशा वास्तूची तोडफोड करणे हे तुम्हाला खरंच योग्य वाटतं का? ही विचार करण्याची गोष्ट आहे.”

यापुढे गिरिजा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल असं म्हणाली की, “बोलण्याची भीती वाटू लागलीच आहे. आपण काय बोलतोय आणि कुठे बोलतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. घरात बोला काय बोलायचं आहे ते. पण कॅमेरा सुरू झाला की सगळे शांत होतात की आपण आता काय बोलतोय. हे चांगलं आहे की वाईट आहे मला नाही माहित. सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय बोलताय त्यावर ताबाच नाही. काय बोलताय त्यावर भान ठेवा. तर हो भान असलं पाहिजे. पण यासाठी एकसारखा कायदा नसू शकतो.”

यापुढे ती म्हणाली की, “भान म्हणजे काय? त्याची सीमा काय? तुम्ही कशाला योग्य आणि कशाला अयोग्य म्हणताय? हे इतकं वैयक्तिक झालं आहे की एखाद्या व्यक्तीला वाईट वाटलं तर त्याने हाणामारी केली आणि संपला विषय तर काय करणार? याचा कोणत्या कोर्टात जाऊन न्याय मागणार? असं नाही असू शकत. तुम्ही ठरवूच शकत नाही. भावना दुखावली जाऊ शकते याचा न्याय कसा देता येणार? एखादी व्यक्ती म्हणेल जोक होता. तुम्हाला वाईट वाटलं तर काय करु? राजकीय जोक होता सांगून करतोय.”

यांनातर गिरिजाने असं म्हटलं की, “वर्षानुवर्षे राजकीय गोष्टींवर उपहासात्मक जोक केले जात आहेत. आचार्य अत्रेंपासून हे सुरू आहे. ज्यांच्यावर जोक केले जायचे ते नेते बघायला यायचे. ते हसायचे. पण आता भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि तोडफोड झाली. आपण भावना दुखावली जाऊ शकत नाही असं म्हणून शकत नाही. मी जे बोलले ते तुला आवडलं नाही. हा इतका गडबडीचा विषय आहे की त्याबद्दल न्यायानिवडा करता येणार नाही. त्यामुळे सोपं आहे की गप्प बसा. यामुळे मुक्तपणे बोलणं हे धोक्यात येणार आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.