कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरी करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका ‘ललित २०५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पैठणीचा पारंपरिक व्यवसाय असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाची गोष्ट या मालिकेतून उलगडणार आहे. या कुटुंबाची प्रमुख आहे आजी. कुटुंबातील दुभंगलेली मनं जोडण्यासाठी सुमित्रा राजाध्यक्ष कसे आणि काय काय प्रयत्न करतात याचं चित्रण या मालिकेत करण्यात आलं आहे. आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धत विरळ होत चालली आहे. त्यातही आजीचा सहवास लाभणं दुर्मिळ होतंय. या पार्श्वभूमीवर, आपल्या पुढच्या पिढ्यांना, आपल्या कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या आजीची धडपड असलेलं कथानक हे या मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

वाचा : ‘तू चिडला आहेस का, श्रीदेवीचे अखेरचे शब्द आजही आठवतात’

‘अग्निहोत्र’नंतर बऱ्याच वर्षांनी सुहास जोशी मालिकेत झळकत आहेत. या मालिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या ‘ही एक कौटुंबिक मालिका आहे. मी साकारत असलेली आजी तुम्हाला तुमच्या आजीची नक्कीच आठवण करुन देईल याचा मला विश्वास आहे.’

आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रॉडक्शननं या मालिकेची निर्मिती केली आहे. आदेश बांदेकर यांचा सुपुत्र सोहम बांदेकर या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्माता म्हणून समोर येणार आहे. ‘ललित २०५’मध्ये सुहास जोशी, सागर तळाशीकर, धनश्री दवांगे, संग्राम समेळ, अमृता पवार, अनिकेत केळकर, कीर्ती मेहेंदळे, अमोघ चंदन, मानसी नाईक अशी उत्तम स्टारकास्ट आहे. शिरीष लाटकर या मालिकेचं लेखन करत आहेत. या मालिकेच्या चित्रीकरणसाठी ठाणे येथे खास सेट उभारण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit 205 marathi serial suhas joshi family drama on star pravah
First published on: 01-08-2018 at 20:00 IST