काही आवाज आपल्या कानात कायमचे घर करतात. लहानाचे मोठे झालो तरी ते आवाज विसरलेलो नसतो. दूरचित्रवाहिन्यांच्या भरमसाट संख्येत, स्मार्ट भ्रमणध्वनी व संगणकाच्या झालेल्या अतिक्रमणामुळे आत्ताच्या पिढीला कदाचित याचा अनुभव नसेल किंवा ‘आवाजा’च्या स्मरणरंजनात ही पिढी रमणारही नाही. पण आत्ता जे ४५-५० शीचे किंवा त्यापुढील वयाचे आहेत, त्यांना ‘कानात बसलेले’ आवाज म्हणजे काय ते लक्षात येईल. दूरदर्शन नव्याने सुरू झाले तेव्हा गोल गोल चक्र फिरत येतानाची विशिष्ट धून, सकाळी पावणेसात वाजता आकाशवाणीवर लागणारे कानू घोष यांचे ‘समूहगान’, आकाशवाणी पुणे केंद्राच्या ७-०५च्या बातम्या आणि सुधा नरवणे, दूरदर्शनचे वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचा भारदस्त आवाज, आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमांची ‘सिग्नेचर टय़ून’ आदी आवाज कानात ‘फिट्ट’ बसलेले आहेत.
दूरदर्शन सुरू होण्यापूर्वी ‘आकाशवाणी’ हे माध्यम प्रभावी होते. आकाशवाणीवर काम करणारे निवेदक, वृत्तनिवेदक त्या काळात ‘रेडिओ स्टार’ म्हणून ओळखले जायचे. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्याही लोकप्रिय होत्या. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे दुपारी पावणेतीन आणि संध्याकाळी सात अशा दोन वेळा बातम्या प्रसारित होतात. संध्याकाळच्या बातम्या राज्यभरातील सर्व आकाशवाणीच्या केंद्रांवरून प्रसारित केल्या जातात. मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करणाऱ्या तीन दिग्गजांचा आवाज त्या काळातील श्रोत्यांच्या कानात व मनात आजही घर करून राहिलेला आहे. शरद चव्हाण, कुसुम रानडे आणि ललिता नेने अशी दिग्गज वृत्तनिवेदकांची फळी तेव्हा कार्यरत होती. आजची ‘पुनर्भेट’ निवृत्त ज्येष्ठ वृत्तनिवेदिका ललिता नेने यांच्याशी.
ललिता नेने मुंबईकरच. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावातील ‘शारदा सदन’ मुलींच्या शाळेत झाले. त्यानंतर एल्फि न्स्टन महाविद्यालयातून त्या ‘बी.ए.’ व ‘एम.ए.’ झाल्या. स्वत:विषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, मी माहेरची नेने आणि सासरची वैद्य. पण आकाशवाणीवर ‘ललिता नेने’ या माहेरच्या नावानेच बातम्या वाचल्या. माझे पती विजय आणि सासरच्यांचे पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा असल्यामुळेच मला असे करता आले हे आवर्जून नमूद करायलाच पाहिजे. आम्ही तिघी बहिणी. मी सगळ्यात धाकटी. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना गिरगावातील राजारामबुवा पराडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले. ‘विशारद’पर्यंत माझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले आहे. ‘एम.ए.’ झाल्यानंतर आमच्या प्राध्यापकांकडून ‘पीएच.डी.’ करणार का म्हणून विचारणा झाली, पण मला आता आणखी शिकायचे नव्हते त्यामुळे मी नोकरीच्या शोधात होते. अशातच १९६७ मध्ये आकाशवाणी मुंबईवर ‘हंगामी कलाकार’ (कॅज्युअल आर्टिस्ट) पाहिजे असल्याची जाहिरात आली. मी अर्ज केला. लेखी परीक्षा आणि आवाजाच्या चाचणीतही उत्तीर्ण झाले. माझ्या आठवणीप्रमाणे ‘ऑडिशन’साठी बहुधा मो. ग. रांगणेकर असावेत. ऑडिशनसाठी नाटकातील एक प्रवेश वाचायला दिला होता. माझ्याबरोबर तेव्हा ऑडिशनला नीलम प्रभू होती. माझी निवड होऊन ‘आकाशवाणी’त प्रवेश झाला.
थेट वृत्तनिवेदक म्हणून सुरुवात झाली की काही वेगळे काम होते, या प्रश्नावर त्यांनी सांगितले, मला वृत्तविभागात काम करायची संधी मिळाली. तेव्हाचे वृत्तसंपादक शं. ना.जोशी यांनी मला भाषांतर करता येते का, असा प्रश्न पहिल्याच दिवशी विचारला. मी प्रयत्न करून पाहते, असे उत्तर त्यांना दिले. त्यांनी मला वृत्तसंस्थेची एक बातमी मराठीत भाषांतर करायला दिली. मला जमेल तसे भाषांतर केले व त्यांना बातमी दाखविली. त्यांना भाषांतर पसंत पडले व ‘ठीक आहे, सरावाने जमेल हळूहळू’ असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे नाही म्हटले तरी मला आत्मविश्वास मिळाला. मग पुढे काही छोटय़ा-मोठय़ा बातम्या ते द्यायला लागले. एकदा ‘कॉन्ट्रॅक्ट’च्या काळात मला दुपारी पावणेतीन वाजताच्या प्रादेशिक बातम्या वाचायची संधी मिळाली. तो अनुभव म्हणजे माझ्यासाठी एक दिव्यच होते. आपण ज्या बातम्या सांगणार त्याकडे अनेकांचे कान असतील, आपल्याकडून बातम्या चांगल्या प्रकारे वाचल्या जातील ना, अशा शंका मनात घेऊन मी स्टुडिओत गेले. बातम्या वाचण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने घाबरले होते. ती भीती आवाजातूनही व्यक्त झाली. कापऱ्या आवाजात बातम्या वाचल्या. पुढे सरावाने बातम्या वाचणे जमत गेले. चार ते सहा महिने मी ‘हंगामी’ म्हणून वृत्तविभागात काम केले.
आकाशवाणीच्या वृत्तविभागातील यशवंत जोशी यांची बदली झाल्यामुळे एक जागा रिक्त होती. त्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात आली. वृत्तनिवेदकाची कायमस्वरूपी नोकरी असल्याने ललिता नेने यांनीही त्या जागेसाठी अर्ज केला. ज्या ठिकाणी आपण ‘हंगामी’ म्हणून काम केले आता त्याच ठिकाणी ‘कायम’ वृत्तनिवेदक म्हणून नोकरी करायला मिळणार हा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच होता.
नोकरीतील कामाच्या स्वरूपाविषयी ललिता नेने म्हणाल्या, दुपारी १ ते ७ अशी आमची कामाची वेळ होती. शरद चव्हाण, कुसुम रानडे आणि मी असे तिघे वृत्तनिवेदक तर वसंत वासुदेव देशपांडे हे आकाशवाणीचे मंत्रालय वार्ताहर होते. दुपारच्या पावणेतीनच्या बातमीपत्राचे काम झाले की दुपारी चार-साडेचार वाजल्यापासून संध्याकाळच्या सात वाजताच्या बातमीपत्राचे काम सुरू व्हायचे. आकाशवाणीचे जिल्हावार नेमलेले प्रतिनिधी, वृत्तसंस्था आणि आमचे वार्ताहर वसंत वासुदेव देशपांडे यांनी आणलेल्या बातम्या घेऊन आमचे बातमीपत्र तयार व्हायचे. आम्ही वृत्तनिवेदकच बातम्यांचे भाषांतर करायचो व बातम्या हाताने लिहायचो. कधी वसंत वासुदेव देशपांडे बाहेरून आले की, आम्हाला बातम्या ‘डिक्टेट’ करायचे. आम्ही त्या लिहून काढायचो. वृत्तसंपादकांकडून बातम्यांच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम लावून दिला जायचा आणि मग हातात कागदांची जंत्री घेऊन आम्ही स्टुडिओत बातम्या वाचायला जायचो.
वृत्तनिवेदक म्हणून नोकरीच्या काळात वाचलेल्या महत्त्वाच्या बातम्या, अनुभव यांचा खजिनाच ललिता नेने यांच्याकडे आहे. त्यातील काही निवडक प्रसंगांना उजाळा देताना त्या म्हणाल्या, ‘कोयना’ भूकंप ही माझ्या आठवणीतील बातमी. आजही ती माझ्या लक्षात आहे. ती बातमी मी वाचली होती. ज्येष्ठ अभिनेते राज कपूर गंभीर आजारी होते. काय व कसे झाले ते कळले नाही, पण आकाशवाणीकडून त्यांचे निधन झाल्याची बातमी प्रसारित केली गेली आणि मीच ती बातमी वाचली. पण नंतर कळले की त्यांचे निधन झालेले नाही. आपल्याकडून चुकीची बातमी दिली गेली याची खंत मनात आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येची बातमी मी वाचली होती. भारतातील पहिली टेस्ट टय़ूब बेबी जन्माला आली ती बातमीही आकाशवाणीवर मी वाचली.
एक आठवण म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांचे मला आलेले वैयक्तिक पत्र. ‘तुम्ही बातम्या खूप छान वाचता. शब्दोच्चार स्पष्ट व शुद्ध आहेत. फक्त विजेच्या चपळाईने न वाचता जरा हळू वाचत जा,’ असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. कुठे प्रवासात, लग्न व अन्य कार्यक्रमांत ओळखीची मंडळीभेटली की तुमच्या बातम्या ऐकतो, छान सांगता असे सांगायची तर अनोळखी लोकांकडून ‘तुमचा आवाज कुठे तरी ऐकलाय, ओळखीचा वाटतोय,’ अशी प्रतिक्रिया मिळायची. नाव सांगितल्यानंतर, ‘अच्छा, तुम्हीच का त्या ललिता नेने, बातम्या सांगणाऱ्या,’ असे म्हणून कौतुक व्हायचे. पुढे दूरदर्शन सुरू झाले. त्यांच्याही बातम्यांची वेळ साडेसातऐवजी सात झाली आणि आकाशवाणीच्या बातम्यांचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले. वृत्तनिवेदकाचे शब्दोच्चार स्पष्ट व शुद्ध असले पाहिजेत. स्वीकारलेल्या प्रमाण भाषेतच बोलले पाहिजे. आवाजातील चढउतार, कोणत्या शब्दांवर कसा जोर द्यायचा, ते कसे उच्चारायचे याकडे त्याने लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकाशवाणीचा वृत्तनिवेदक समोर दिसत नसल्याने केवळ आवाजाच्या माध्यमातून त्याला श्रोत्यांपर्यंत बातमी पोहोचवायची असते. त्यामुळे ते ही भान त्याने ठेवले पाहिजे. वृत्तनिवेदकाने भरपूर वाचन करावे, ताज्या घडामोडींची, सद्य सामाजिक व राजकीय परिस्थितीची त्याला चांगली जाणही असावी. बोलण्यात सहजता हवी. आपण ‘वाचतोय’ असे श्रोत्यांना न वाटता त्यांच्याशी बोलतोय, संवाद साधतोय, अशा प्रकारे बोलणे असावे, असा सल्लाही त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांसाठी दिला.
ललिता नेने यांना नीरजा ही विवाहित कन्या, जावई सलील आणि दोन नातवंडे हा त्यांचा परिवार. नीरजा परदेशी वास्तव्यास असली तरी आईशी सतत संपर्कात असते. दोन वर्षांतून एकदा भारतात येणेही होते. ७३व्या वर्षांत असलेल्या ललिता नेने आता वयोपरत्वे आणि गुडघेदुखीमुळे फारशा घराबाहेर पडत नाहीत. पुस्तकांचे वाचन, गाणी ऐकणे आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका विशेषत: बातम्या पाहणे व ऐकणे हा त्यांचा विरंगुळा आहे.