आपल्या आवाजाच्या जादूने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या सपर्कात राहणार आहेत. लतादीदींनी वयाच्या ९०व्या वर्षी इन्स्टाग्रामवर आपले अकाऊंट उघडले आहे.
इन्स्टाग्रामवर आल्यावर त्यांनी सर्वात प्रथम आपल्या आई वडिलांच्या फोटोचा अल्बम शेअर केला. त्यानंतर त्यांनी आपली बहीण मीना मंगेशकर-खडीकर यांच्या सोबत काढलेला एक फोटो शेअर केला. लतादीदी यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीना मंगेशकर-खडीकर यांचे आत्मचरित्र गेल्या वर्षी प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचा हिंदी अनुवाद नुकताच प्रकाशीत झाला. या पुस्तकाचे नाव ‘दीदी और मैं’ असे असुन हे पुस्तक हातात घेऊन काढलेला एक फोटो लता दीदींनी आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.
लतादीदींनी अपलोड केलेल्या या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अकाऊंट उघडल्यावर काही तासातच लता मंगेशकर यांचे इन्स्टाग्रामवर तब्बल ४७ हजार फॉलोअर्स झाले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असुन नेटकऱ्यांनी लतादीदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.