अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या ना- त्या कारणामुळे तो चर्चेत येत असून यातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  ‘बम भोले’ असे या गाण्याचे बोल आहेत. विशेष म्हणजे या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच अक्षय एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. या गाण्यात अक्षयचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे.

प्रदर्शित झालेल्या ‘बम भोले’ या गाण्यातून लक्ष्मी काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. यात अक्षयने लाल रंगाची साडी नेसली असून केस मोकळे सोडले आहेत. त्यामुळे त्याचा हा लूक अंगावर काटा आणणारा असल्याचं पाहायला मिळतं.

हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्याला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. तर अनेकांनी अक्षयवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लक्ष्मी या चित्रपटात अक्षय एका तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारत असून अभिनेत्री कियारा आडवाणीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान,अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.