ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. अनेक मातब्बर कलाकार आयुष्यात एकदा तरी ऑस्कर मिळावा ही मनीषा मनात बाळगून आयुष्यभर अभिनयाची तपश्चर्या करतात. काहींना ‘ऑस्कर’ नाही पण किमान नामांकनापर्यंत तरी मजल मारता येते, पण अनेकजण उत्कृष्ट अभिनय  प्रदर्शन करूनही आयुष्यभर ‘ऑस्कर’ क्षणाची वाट पाहत राहतात. लिओनार्दो दी कॅप्रिओ हे नाव शेवटच्या यादीत मोडणारे आहे. दमयंतीने नलाची जितकी प्रतीक्षा केली नसेल तितकी लिओनार्दोने ‘ऑस्कर’ची प्रतीक्षा केली. त्याने ‘द एव्हिएटर’, ‘द वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’, ‘इन्सेप्शन’, ‘द डीपार्टेड’ असे एकसे एक चित्रपट देणाऱ्या लिओनार्दोला खरं म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी ‘टायटॅनिक’साठी ऑस्कर नामांकन मिळालं होतं. पण त्यानंतरही केवळ नामांकनावरच बोळवण करत तब्बल पाच वेळा या पुरस्काराने त्याला हुलकावणी दिली. अखेर, ‘द रेव्हनंट’ या चित्रपटासाठी त्याला इतक्या वर्षांच्या मेहनतीनंतर ऑस्कर मिळाला. पण आता हा एकमेव लाखमोलाचा पुरस्कोरही त्याने परत केल्यामुळे हॉलीवूड चित्रनगरीत एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात खुद्द लिओनार्दोलाच चाहत्यांनी विचारणा केली तेव्हा त्याने ऑस्कर पुरस्कार परत केला नसून ‘रेड ग्रेनाइट पिर्स’ या प्रॉडक्शन कंपनीने दिलेला पुरस्कार परत दिला असल्याचे स्पष्ट केले. त्याने आजवर केलेल्या उत्तम अभिनयासाठी या कंपनीने १९५४ साली ‘ऑन वॉटर फ्रंट’ या चित्रपटासाठी ‘मार्लो ब्रांडो’ या अभिनेत्याला मिळालेले ऑस्कर सन्मानचिन्ह त्याला भेट स्वरूपात दिले होते. आणि हा पुरस्कार त्याने कंपनीला परत केला आहे. सध्या ही कंपनी मलेशियात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकली आहे. अशा कंपनीशी कोणत्याही प्रकारचे नाते ठेवण्याची आपली इच्छा नसल्याने त्याने हा पुरस्कार परत केल्याचे सांगितले.