लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार सिनेअभिनेते रमेश देव यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संदेश उमप यांनी शुक्रवारी ठाण्यात दिली. गेल्या तीन वर्षांपासून लोकशाहिरांच्या स्मरणार्थ लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध हा पुरस्कार देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले.  
येत्या रविवार, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळात गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. लेखक गंगाराम गवाणकर, साहित्यिक प्रेमानंद गज्वी, सामाजिक कार्यकर्ते कै. नरेंद्र दाभोळकर, चित्रपट दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, लोककलावंत राजुबाबा शेख, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, प्रकाश योजनाकार शीतल तळपदे, संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री मधू कांबीकर आदींना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.
तर या कार्यक्रमात लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर, शिवशाहीर सुरेश जाधव, डॉ. गणेश चंदनशिव, आदर्श शिंदे, ऊर्मिला धनगर, पंढरीनाथ कांबळे, अतुल तोडणकर, अरुण कदम, महेंद्र कदम, उमेश बने आदी कलाकार या वेळी आपली कला सादर करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.