नातं यशस्वी करायला खूप मोठमोठय़ा गोष्टी कराव्या लागत नाहीत. जगणं आनंदी करायला लागतात त्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी. हे अगदी सहजपणे सांगणारी कलाकृती म्हणजे ‘लिटल थिंग्ज’ ही वेब सीरिज. सिनेमांतल्या नायक-नायिकांबद्दल केमिस्ट्री हा शब्द नेहमी लिहिला, वाचला, ऐकला जातो. केमिस्ट्री म्हणजे दोन प्रमुख पात्रांचं एकमेकांसोबत असलेलं टय़ुनिंग, एकमेकांना दिलेली दाद, एकमेकांचं केलेलं कौतुक. हे सगळं पडद्यावर बघताना प्रेक्षकांकडून मिळणारी वाहवा त्या केमिस्ट्रीला मिळालेली पावती असते. अशीच जबरदस्त केमिस्ट्री बघायची असेल तर ‘लिटल थिंग्ज’ ही वेब सीरिज बघाच.
काव्या कुलकर्णी आणि ध्रुव सेहगल हे दोघे एकत्र राहत असतात. त्यांच्या रोजच्या जगण्यात वाद, राग, गमती, प्रेम, मतभेद असं सगळं असतं. काव्या आणि ध्रुव एकमेकांच्या प्रेमात असतात. एकमेकांना समजून घेणारंी ही जोडी. त्यांच्या जगण्यात सहजता आहे, काहीही कृत्रिमपणा नाही. मुळात या वेब सीरिजला साचेबद्ध कथावस्तूच नाही. फक्त दृश्यांची, जगण्याची, नात्यातील मर्मबंध अनुभवण्याची ही दृश्यमाला आहे. फक्त बघत राहावं आणि अनुभवत राहावी अशी. तरुण मनाचा, कोणत्याही वयाचा प्रेक्षक या दृश्यमालेशी सांगड घालेल. प्रत्येक भाग मनाला आनंद देणारा, प्रफुल्लित करणारा आहे. त्यामुळे काव्या आणि ध्रुव हे प्रेक्षकांना आपले वाटू लागतात.
कुठलीही गोष्टी थोपण्याचा वा पुरस्कार करण्याचा अट्टहास यात नाही. कारण नातं तयार होतंच मुळात छोटय़ा छोटय़ा गोष्टींपासून! नवरा, बॉयफ्रेण्ड, जोडीदार कसा असावा, नातं कसं असावं, ते दोघंही छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून नातं कसं टवटवीत ठेवतात हे सगळं या सीरिजमधून कळेल. ही सीरिज बघताना दोघे लिव्ह इनमध्ये राहताहेत की त्यांनी लग्न केलंय ते स्पष्ट होत नाही आणि त्याची गरज आहेच कुठे? लग्न वा प्रेम या टॅगखाली अडकण्यापेक्षा दोघांमध्ये ‘कम्पॅटिबल’ असणं महत्त्वाचं असतं.
यातील काव्या प्रेमात पाडतेच, पण या सीरिजचा खरा किंग आहे तो ध्रुव! पार्टनर कसा असावा तर ध्रुवसारखा. तो तिला समजून घेतो, पण तो उगाच जड, अति परिपक्व, कंटाळवाणा नाही. मुळात दोघेही अल्लड आणि तरीही परिपक्व आहेत. तो तिच्या आधीच्या सर्व प्रेमप्रकरणांवर तिच्याशी गमतीने बोलतो; पण कधी तोही चिडतो. त्याची प्रत्येक कृती, देहबोली अगदी कूल आहे. तो मोकळ्या मनाचा आहे. गणितात पीएचडी करतोय आणि त्याच भाषेत तो तिला बरेचदा व्यावहारिक बौद्धिकं देत असतो; जे समजायला ऐकायला बिलकूलही जड नसतं. मिथिला पालकर आता सगळ्यांनाच माहिती आहे. उत्स्फूर्तता हा तिच्या अभिनयातील गुण आहे. आवाजावरील नियंत्रण, सुसंगत शब्दफेक, अत्यंत भावदर्शी चेहरा या बळावर तिने ही वेब सीरिज आणि काव्या जिवंत केलीय.
ध्रुव सेहगल यानेच या सीरिजचं लेखन केलंय. या दोघांचे व्हिडीओज यापूर्वीच लोकप्रिय झाले आहेत. ‘लिटल थिंग्ज’ या सीरिजचे पाच भाग आहेत तेही अगदी पंधरा सोळा मिनिटांचेच; पण प्रत्येक भाग हा डोळ्यांना, मनाला ट्रीट देणारा आहे. यातील एका भागात काव्याला तिच्या आधीच्या प्रियकराचं लग्न ठरलंय हे कळल्यावर अस्वस्थ होते. तेव्हा ध्रुव तिला गणिताच्या भाषेत ज्या प्रकारे समजावतो तो संपूर्ण भाग, दृश्य, संवाद अगदी लाजवाब आहेत! तो या संपूर्ण सीरिजमधला सर्वोत्तम हलकाफुलका भाग. कधी तोही नाराज होतो तेव्हा ती त्याला हसवते. त्याचा मूड चांगला करते. खाणं आणि गेम ऑफ थ्रोन्स ही वेब सीरीज हा त्याचा वीक पॉइंट असतो. कधी दोघांचाही दिवस वाईट जातो तेव्हा दोघेही एकमेकांना चीअर अप करतात. बरेचदा यात ध्रुव पहिलं पाऊल उचलतो. शेवटचा भाग हा अगदी मनाला स्पर्श करणारा आहे. शहराबाहेर तळ्याकाठी त्या दोघांचा संवाद, त्यांची केमिस्ट्री! वाह!
इतकं हलकंफुलकं लिहून ते हृदयस्पर्शी करणं यासाठी ध्रुव सेहगलला हॅट्स ऑफ! प्रेमात पडणाऱ्या इच्छुकांनी, प्रेमात पडलेल्यांनी, नात्यात वाद होत असलेल्यांनी- सगळ्यांनी ही सीरिज बघावीच! प्रेमाचे, नात्याचे नवे परिमाण गवसतील. त्यामधून समजणारी सर्वोत्तम गोष्ट एकच- ती म्हणजे नात्यात हलकाफुलका संवाद हा ‘की फॅक्टर’ असतो आणि त्यासाठी काहीही मोठं करावं लागतं नाही, तर छोटय़ा छोटय़ा गोष्टी कराव्या लागतात. म्हणूनच महत्त्वाची असते ती ‘छोटी सी बात!’
अभिजित पानसे
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा