वैशाली चिटणीस
लैंगिक शिक्षणासारखा गंभीर विषय सहजसोप्या पद्धतीने कसा हाताळायचा याचं प्रात्यक्षिक म्हणजे ही पाच भागांची वेबसीरिज. गोळीबंद स्क्रीप्ट, बालकलाकारांसकट सगळ्यांचाच उत्तम अभिनय यासाठी ही वेबसीरिज पाहायलाच हवी.
‘पप्पा मुझे भी कण्डोम कॅण्डी चाहिए’ असं एखादा पप्पू चारचौघांत भोंग्याच्या आवाजात जाहीर करतो तेव्हा त्याच्या आईबापांना इथल्या इथे धरती दुंभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं त्या क्षणी वाटत असतं. बरं यात पप्पूची काहीच चूक नसते. वेगवेगळ्या फ्लेवर्सची जाहिरात बघून त्याच्या बालबुद्धीने हा अर्थ लावलेला असतो. पप्पूचे असे प्रश्न कधीही न संपणारे असतात. बाळ कुठून येतं, ते आईच्या पोटात कसं जातं, टीव्हीवरचे ते दादा-ताई असा नाच का करतात, मोठय़ा तायापण डायपर वापरतात का (सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात बघून पप्पूने लावलेला अर्थ) या प्रश्नांची काय उत्तरं द्याायची हे त्याच्या आईबाबांना, आजीआजोबांना कधीच कळत नाही आणि मग काहीतरी थातूरमातूर उत्तरं देऊन विषय उडवून लावला जातो. पप्पूचं कुतूहल मात्र कधीच संपत नाही. त्याच्या मागाने तो उत्तरं मिळवतो आणि चुकीच्या उत्तरांचे दुष्परिणाम आयुष्यात बराच काळ भोगत राहतो.
पण एका पप्पूच्या बाबतीत असं अजिबात घडत नाही. त्याचे पप्पा त्याच्या सगळ्या निरागस प्रश्नांची त्याच्या बालबुद्धीला समजतील अशी खरीखुरी उत्तरं देतात. मला माझ्या मुलाचा बाप नाही, तर मित्र बनायचंय या भूमिकेवर ते अगदी ठाम आहेत. त्यामुळेच पप्पूच्या अडनिडय़ा प्रश्नांवर त्यांना पप्पूच्या रोजच्या आयुष्यातल्या उदाहरणांमधून उत्तरं सापडत जातात. ती उत्तरं ऐकल्यावर आपल्यालाही वाटतं, अरे हे इतकं सोपं होतं? मग एवढं कठीण का करून ठेवलं आहे आत्तापर्यंत?
अर्थात हे पप्पू आणि पप्पा वास्तवातले नाहीत. ते आहेत सायबर विश्वातले. ‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पप्पा’ या वेबसीरिजमधले. वाय फिल्म्सची ही लंगिक शिक्षणावरची पाच भागांची अप्रतिम वेबसीरिज आहे. लंगिक शिक्षण किंवा सेक्स एज्युकेशन म्हटलं की त्याच्याभोवती सगळे टॅबू एकवटतात. लहानग्यांना दाखवायचा नाही, त्यांच्यासमोर मोठय़ांनी बोलायचा नाही, असा हा विषय. त्याचं शिक्षण वयात आलेल्या मुलांना गांभीर्याने देणं अपेक्षितही आहे. पण पाच-सात वर्षांची पिटुकली जेव्हा लंगिकतेशी संबंधित प्रश्न विचारतात तेव्हा साध्यासोप्या भाषेत, त्यांना समजेल अशा उदाहरणांमधून हा विषय कसा समजावून सांगता येतो, हे या धमाल वेबसीरिजमधून लक्षात येतं. शिवाय प्रत्येकाने तीच उदाहरणं दिली पाहिजेत असंही नाही. तुम्ही तुमची वेगळी उदाहरणं शोधूही शकता. पण मुलांनी प्रश्न विचारलेच तर हा विषय सोपा कसा करायचा हे ही वेबसीरिज एकदम मस्त पद्धतीने सांगते.
प्रत्येकी दहा मिनिटांच्या पाच भागांच्या या वेबसीरिजमध्ये ही गोष्ट आहे, सात वर्षांच्या पप्पूची. खटय़ाळ, खोडकर, चौकस आणि तितकाच निरागस पप्पू वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्या पप्पांना म्हणजे अंकित वास्ता यांना भंडावून सोडतो. पप्पूची आई गर्भवती आहे. त्याच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचा म्हणजे पप्पूच्या आजोबांचा नंबर मोबाइलमध्ये मोगॅम्बो नावाने सेव्ह केलाय यावरूनच या आजोबांच्या एकूण व्यक्तिमत्वाची कल्पना येते. तर पप्पूची आजी मात्र अतिशय परिपक्व दाखवली आहे. अशा कुटुंबातला पप्पू आपल्या आसपास जे काही बघतो, ऐकतो ते त्याचं संवेदनशील मन टिपकागदासारखं टिपून घेत असतं. तो टीव्हीवरच्या कुठल्यातरी डिस्कशनमध्ये ऐकतो की इंटलेक्टुअल मास्टबेशन होना चाहिए.. इंटलेक्चुअल म्हणजे काय ते त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याला क्रिकेट ग्राऊंडवर घ्यायला आलेल्या पप्पांना तो चारचौघांत धाडकन विचारून टाकतो, पप्पा ये मास्टबेशन क्या होता है.. पप्पूच्या या अडनिडय़ा प्रश्नांना उत्तरं देऊ नकोस, टाळत जा किंवा देवाने सांगितलं वगरे सांगत जा असं पप्पूच्या आजोबांचं म्हणणं आहे. पण पप्पूचे पप्पा आपल्या वडिलांच्या बोलण्याकडे लक्ष न देता पप्पूला त्याच्या भाषेत म्हणजे अगदी जॅक आणि जिलच्या गोष्टीच्या माध्यमातून हा विषय समजावून सांगतात. त्याशिवाय कण्डोम, पिरियड्स, प्रेग्नन्सी आणि होमोसेस्शुअॅलिटी हे विषयही या वेब सीरिजमधून हाताळले आहेत.
या वेब सीरिजच्या मुळाशी आठ विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक यांची गोष्ट सांगणारी पाच भागांची सेक्स एज्युकेशन ही अमेरिकन वेब सीरिज आहे, असं काहीजणांचं म्हणणं आहे. असेलही कदाचित, पण तिचं भारतीयीकरण अत्यंत उत्तम झालं आहे. पाचजणांच्या या कुटुंबाचं वास्ता हे आडनावही लंगिक शिक्षणासारखा विषय, त्यातल्या समजुती-गरसमजुती हलक्याफुलक्या भाषेत, खूपदा विनोदाच्या अंगाने जात प्रभावीपणे मांडणाऱ्या महेंद्र वास्ता या इंग्रजी वर्तमानपत्रांतून या विषयावर लिखाण करणाऱ्या डॉ. महेंद्र वास्ता यांच्यावरून घेतलं असावं असाही काहीजणांचा कयास आहे.
वाचा : ‘कोणत्याही मुलीला किस केल्यास मी तुझे ओठ चिरेन’
यात सात वर्षांच्या पप्पूची भूमिका केली आहे, कबीर साजिदने. त्यानेच गायक शानबरोबर सीरिजचं शीर्षकगीतदेखील गायलं आहे. पप्पूचे बाबा झाले आहेत, आनंद तिवारी. वेबदुनियेतला हा एक गुणी नट आहे. पप्पूच्या पप्पाच्या पप्पांची म्हणजेच कर्मठ, किरकिऱ्या मोगॅम्बो आजोबांची भमिका सचिन पिळगावकर यांनी एकदम धमाल वठवली आहे. अलका अमीन या पप्पूच्या आजी आहेत, तर संजिता शेख पप्पूची आई आहे.
या वेबसीरिजचं यश तिच्या हाताळणीमध्ये आहे. मुलांनी असे प्रश्न विचारले की आई-वडिलांना अवघडल्यासारखं होऊन जातं. त्या मुलाला गप्प बसवण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण तसं न करता त्याला त्याच्या भाषेत, त्याला समजेल असं उत्तर द्या हेही वेबसीरिज सांगते. मुख्य म्हणजे पाच प्रश्नांच्या उदाहरणांमधून असं उत्तर देतेही. त्या सगळ्याला विनोदाचा बाज दिल्यामुळे वेबसीरिजचं मनोरंजन मूल्य वाढलं आहे. पप्पूला मासिक पाळीबद्दल समजावून सांगणारा भाग हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. पप्पू सॅनिटरी नॅपकीन नाक पुसायला वापरतो. तेव्हा हे नॅपकीन नाक पुसायला वापरायचे नसतात असं त्याची आई त्याला सांगते. मग कशासाठी वापरायचे, हा त्याचा पुढचा प्रश्न. त्याची आई त्याला सांगते की मला दर महिन्यातून एकदा रक्त येतं म्हणून ते मला वापरावे लागतात. पप्पूचा पुढचा साहजिक प्रश्न असतो की का रक्त येतं, तुला कुठे काही लागलंय का वगैरे. मग त्याचे बाबा त्याला सांगतात, की पिरीयड्स म्हणजे निसर्गाने तुझ्या आईला दर महिन्याला पाठवलेला ई-मेल असतो. त्याला मेल स्पर्म फाइलने येस असं उत्तर दिलं तर बाळ तयार होतं. पप्पू लगेच विचारतो, मेल स्पर्म फाइलने येस उत्तर दिलं नाही तर तो मेल स्पॅम होतो का? याआधीच्या भागात मास्टबेशन, कण्डोम यावरच्या पप्पूच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्याला समजू शकणारी कम्प्युटरची भाषा वापरली गेली आहे, तिचाच हा पुढचा भाग आहे.
यातली सगळ्यात जमेची बाजू म्हणजे पप्पूची भूमिका करणारा कबीर साजिद. तो प्रत्यक्षात पप्पूच्याच वयाचा आहे. त्यानं हे काम अतिशय समजून उमजून केलं आहे. पण मुख्य म्हणजे लेखक- दिग्दर्शकांनीदेखील त्या व्यक्तिरेखेचा निरागसपणा जरादेखील ढळू दिलेला नाही. खूपदा पडद्यावरच्या लहान मुलांच्या व्यक्तिरेखा अचानक प्रौढ होऊन जातात आणि पडद्यावरची ही लहान मुलं मोठय़ांना लहान मुलांनी जसं वागणं अपेक्षित असतं तसंच वागायला- बोलायला लागतात. सुदैवाने पप्पूच्या वाटय़ाला सुजाण, समंजस बाबांसारखेच सुजाण लेखक- दिग्दर्शक आले आहेत.
हे उच्चमध्यमवर्गीय कुटुंब, त्याचं जगणं प्रत्येक दहा मिनिटांच्या भागातूनदेखील एकदम नीटसपणे जाणवत राहतं. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक आशीष पाटील यांनी द्यायलाच हवं. लेखक गोपाळ दत्त आणि देवांग कक्कड यांनी मालिकेचा हलकाफुलका, चटपटीत बाज कायम ठेवला आहे. यशराज फिल्म्सची ही निर्मिती एकदम देखणी आहे. लंगिक शिक्षणासारखा अवघडलेला वाटणारा विषयदेखील कसा सोपा, सहज करता येतो याची झलकच या पाच भागांमधून पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही वेब सीरिज िहदी, इंग्रजी, स्पॅनिश, जर्मन, मला, थाय अशा वेगवेगळ्या १५ भाषांमध्ये उपलब्ध आहे. लैंगिक शिक्षणासारखा गंभीर विषयावरचे प्रश्न लहान मुलं विचारतात तेव्हा मुलांना काय सांगायचं, यापेक्षा कसं सांगायचं याचं प्रात्यक्षिकच यू टय़ूबवरील या वेब सीरिजमधून पाहायला मिळतं.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा