चैताली जोशी
मालिकांमध्ये नायक-नायिकांसोबतच आता गरजेचा असतो खलनायक. सतत सगळं छान छान दाखवण्यापेक्षा मालिकेत काही तरी तडका आणून मालिका आणखी मनोरंजक केली जाते आणि हा तडका देतात खलनायक!
‘यश-जुईच्या संसारात नाही ना विष कालवलं तर बघच’, ‘ही मास्तरीण सोताला लै शानी समजतेय’, ‘मीराला धडा शिकवायची वेळ आलीये आता’, ‘इस गौरी को अब बनारस का पानी दिखाना पडेगा’, ‘तसं केलं नाहीस तर.. ओ ओ ओ’ ही अशी आणि बरीच वाक्यं संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान कानावर पडत असतात. ही वाक्यं कोणती, कुठली असं विचारताय? सोप्पंय. विभा, सानिका, परसु, अम्मा यांची आहेत ही वाक्यं. आता ही मंडळी कोण हे विचारू नका. करेक्ट! ही सगळी विविध मालिकांमधली खलनायक मंडळी. एक वेळ नायक-नायिकांना विसरायला होईल, पण खलनायक नेहमी लक्षात राहतात. ‘वादळवाट’मधला देवराम खंडागळे आजही व्यवस्थित आठवतो. ‘तू तिथे मी’चा दादा होळकर लक्षात राहिलाय. ‘चार दिवस सासूचे’मधली सुप्रियासुद्धा आठवते, तर ‘देवयानी’मधले भारदस्त आवाजाचे तिचे सासरेही आठवतात. मालिकांमधल्या खलनायकांचा रुबाब असतोच जरा वेगळा. खरं तर ते नकोसे वाटतात, पण त्यांच्याशिवाय मालिकेला मजासुद्धा नाही. ही सगळी मंडळी कटकारस्थानं करतात, पण तितकीच मनोरंजन करणारीही आहेत.
प्रत्येक माध्यमात कालांतराने काही ना काही बदल होत असतात. कधी ते प्रेक्षकांना आवडणारे असतात, तर कधी नावडणारे. या बदलांमध्ये मालिकेचा विषय, नवे चेहरे, कल्पनांमधलं वैविध्य, कार्यक्रमांच्या वेळा अशा अनेक गोष्टी येतात. या बदलांमागे अनेकदा व्यावसायिक गणितं असतात. गेल्या काही वर्षांमध्ये टीव्ही हे माध्यम झपाटय़ाने बदलतंय, पण एक गोष्ट अशी आहे जी आजपर्यंत बदलली नाही. ती म्हणजे खलनायक हे पात्र. नायक-नायिकांशिवाय मालिका पूर्ण होत नाही तसंच खलनायकांशिवायही मालिकेत गंमत नाही असा अलिखित नियमच आहे. त्यांच्याशिवाय मालिकेला तडका लागून मालिका झणझणीत व्हायला नको? व्हायलाच हवी. शेवटी प्रश्न टीआरपीचा आहे.
मालिकेत सगळंच गुडी गुडी दाखवलं तर त्यात काही घडेल का? तर नाही. काही मालिका याला अपवाद आहेत म्हणा. कारण काही मालिकांमध्ये विशिष्ट असा कोणी खलनायक नव्हता. त्या मालिकांमध्ये काही वेळा परिस्थितीच खलनायक म्हणून पुढे राहिलेली दाखवली आहे. त्याही मालिका यशस्वी झाल्याच. त्यामुळे खलनायक नाही तर मालिका हिट नाही असंही म्हणता येणार नाही; पण खलनायकांचा एक्स्ट्रा मनोरंजनाचा डोस असला की जरा आणखी मजा येते, हेही नाकारता येणार नाही. ही खलनायक मंडळी ज्या प्रकारे कारस्थानं करतात त्याला तोड नाही. त्यांच्याकडे बघून प्रश्न पडतो, की त्यांच्याकडे इतका वेळ येतो कुठून आणि त्यांना इतकं सुचत कसं? याचं उत्तर ‘ती फक्त मालिका आहे. खरं नाही. मालिका बघून सोडून द्या’ असं असू शकतं; पण प्रश्न पडला तर पडलाय ना. या खलनायकांची आणखी एक गंमत अशी की ते कारस्थानं करतात आणि अनेकदा स्वत:च त्यात अडकतात. यात पहिला नंबर लागेल तो वहिनींचा. अंहं.. आदेश भाऊजींच्या वहिनींपैकी वहिनी नाही ही. झी मराठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतल्या वहिनी. तिला छानछौकीची, मोठय़ा मालमत्तेची मालकीण होण्याची हौस आहे. या नादापायी ती मालिकेच्या नायिकेला म्हणजे अंजलीला सतत पाण्यात बघते. शिक्षिकेसमोर एकेक डाव टाकताना कुठून कुठून क्लृप्त्या शोधून काढते आणि स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेते याची असंख्य उदाहरणं मालिकेत आहेत. आता हे नसतं तर पाठकबाई आणि राणाजींची लवश्टोरी साधी, सरळ झाली असती. तसं नकोच. त्यामुळे वहिनींची कारस्थानं चालू राहू देत.
स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतल्या सानिकाचं असंच आहे. तीसुद्धा मीराला सतत पाण्यात बघत असते. तिच्या वरचढ होण्यासाठी ती एकेक डाव करते आणि स्वत:च त्यात अडकत जाते. मग पुन्हा बाहेर येते, पुन्हा कारस्थान; हे असं चक्र चालूच ठेवते; पण कधी कधी असंही वाटून जातं की, त्या मीराच्या सततच्या रडगाण्यापेक्षा सानिकाचे हे उद्योग बरे. तशीच तिकडे विभा. कलर्स मराठीच्या ‘अस्सं सासर सुरेख बाई’मधल्या नायिकेची म्हणजे जुईची सख्खी मोठी बहीण. आता खरं तर सख्ख्या मोठय़ा बहिणीने कसं असावं? विभा त्याच्या एकदम विरुद्ध. बहिणीच्या संसारात एकदम ढवळाढवळ करत असते. खोटं वागते, नाटक करते; पण समजा, हे असं पात्रच नसतं तर? एक तर जुई अतिशय शांत, समजूतदार, गुणी मुलगी. यशही काहीसा त्याच पठडीतला. त्याच्या घरचेही काहीसे तसेच आहेत. मग मालिकेत काहीच ‘घडलं’ नसतं. मालिकांमध्ये हे ‘घडणं’ फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी विभा हवीच.
खलनायकांचं असणं हे मालिका लोकप्रिय होण्यामागचं एक तंत्र आहे. एक मालिका त्यात नायक-नायिका, कुटुंब हवं. त्यात काही तरी गोष्ट हवी. गोष्टीत वळणं हवीत. या वळणांवरचे अडथळे हवेत. जर ही वळणं, अडथळे नसतील तर मार्ग सरळ, साधा, सोपा असेल. मग इतकी साधी मालिका कोण बघणार, टीआरपी कसा मिळणार. म्हणून ती चटपटीत करायलाच हवी ना. त्यासाठीच या मार्गावरचे अडथळे तयार केले जातात. ते खलनायकांच्या रूपात प्रेक्षकांसमोर येतात. आता या अडथळ्यांवरून सहीसलामत पुढे जाणाऱ्या नायक-नायिकांची यशस्वी आणि आनंद देणारी कहाणी इथे सांगायची असते. म्हणूनच मालिकेत खलनायक आणला जातो. अडथळाच नाही तर मग यशस्वी, आनंद देणारी कहाणीच बघायला मिळणार नाही.
सध्या सुरू असलेल्या मराठी मालिकांमधले काही खलनायक नातेवाईक-मित्रपरिवार यांच्यातले आहेत, काही कुटुंबातलेच, तर काही सासूच्या रूपातले. खरं तर सासू-सून हा मेलोड्रामा छोटय़ा पडद्याला तसा नवीन नाही; पण आता सासूंची कारस्थानं थोडी वेगळ्या प्रकारे पुढे येतात. ‘गोठ’ या मालिकेतली बयो आजी अशीच आहे. ही बयो आजी म्हणजे राधाची आजेसासू. चेहरा हसरा ठेवून कोणतेही खुनशी हावभाव न करता चूपचाप कारस्थानं करणारी बयो आजी लोकप्रिय आहे. तिचा आब बघावासा वाटतो. खलनायक असली तरी प्रेक्षकांना ती पडद्यावर दिसायला हवी असते. तिला राधा-विलासचा संसार सुखी करू द्यायचा नाही. हे चुकीचं असलं तरी बयो आजीचं मालिकेत असणं प्रेक्षकांना हवंय. बयो आजीच्या कारस्थानांशिवाय राधा-विलासला एकमेकांबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाली नसती आणि ते एकत्र आले नसते.
अजून एक खाष्ट सासू प्रचंड लोकप्रिय आहे. ‘काहे दिया परदेस’मधली अम्मा. गौरीची सासू. अम्माचा पहिल्या दिवसापासून गौरीवर राग आहे. ती कायमची घराबाहेर कधी जाईल याचीच ती वाट बघतेय. त्यासाठी तिचे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत; पण हिच्या कारस्थानांची खूप मजा येते. ही एकेक कट रचत असते. अम्माच्या जोडीला फुफा म्हणजे अम्माच्या नणंदेचा नवरा असतोच. त्यांनी रचलेले कट खाली पाडायचं काम करते माताजी म्हणजे अम्माची सासू. त्यामुळे इथे गौरीला प्रत्यक्ष असं फार काहीच करायचं नाही; पण या प्रत्येक डावात मनोरंजन मात्र जबरदस्त होत असतं. गंमत अशी आहे इथे गौरीची आजेसासू गौरीला साथ देणारी आहे, तर ‘गोठ’मधली राधाची आजेसासू तिच्याविरुद्ध उभी आहे. ‘सरस्वती’ मालिकेतही सासू-सून हे युद्ध दिसतं. विदुला म्हणजे सरस्वतीची सासू तिच्या कायम विरोधात असते. तिच्याविरोधात काही ना काही कट रचतच असते. तिला भिकुमामाची साथ मिळते; पण प्रत्येक वेळी सरस्वतीचीच जीत होते. कारस्थानांशिवाय सरस्वतीची जीत होणार तर कशी? त्यामुळे विदुला आणि भिकुमामांची कारस्थानं अशीच चालू राहणार असं दिसतंय.
वाचा : …हे आहेत बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्शिअल कपल्स’
या सगळ्यात एक खलनायक वेगवेगळ्या रूपांतून एका मालिकेत झळकला आहे. ‘दुहेरी’मधला परसु हा खलनायक आतापर्यंत विविध रूपं घेऊन मालिकेत वावरला आहे. दोन कुटुंबांमधलं बऱ्याच वर्षांपासूनच्या वैमनस्यातला परसु म्हणजे महत्त्वाचा दुवा आहे. बल्लाळदेवशी हातमिळवणी करून दोन निरागस मुलींच्या आयुष्यात परसु येतो आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतो. त्या दोन बहिणी आणि परसु यांच्यातलं हे युद्ध वेळोवेळी मनोरंजक ठरलेलं आहे. परसु ही व्यक्तिरेखा मधल्या काळात सकारात्मक होतेय का असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. परसुची एक स्टाइल आहे. मैथिलीला कोणत्याही प्रकारची धमकी दिली की तो ‘ओ. ओ. ओ..’ असं गाण्याच्या चालीत म्हणतो. हा त्याचा संवाद लोकप्रिय झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकांमधल्या कोणत्याच खलनायकाची भीती वाटत नाही; किंबहुना हे सगळेच नायक-नायिकांइतकेच लोकप्रिय आहेत. खलनायक लोकप्रिय होण्याचं आणखी एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधली शनाया. ही विशेषत: लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिला थेट खलनायक म्हणता येत नसलं तरी ती कारस्थानं करणारीच आहे, हे नाकारता येणार नाही. ‘खुलता कळी खुलेना’मधली मोनिकाही तशीच. पैशांच्या हव्यासापायी दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करणारी मोनिका स्वार्थी आहे. मालिका तीन वर्षांनंतर पुढे गेल्यानंतरच्या काही भागांमध्ये मोनिका दिसली नव्हती. त्या वेळी ‘मोनिकाचं काहीच सांगत नाहीयेत हे. ती का दिसत नाहीये या भागांमध्ये’ अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून येत होत्या. त्यामुळे तिची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते हे मान्य करावंच लागेल. कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘बालपण देगा देवा’मध्ये नयनतारा हे एक कारस्थानी पात्रं. मालिका नुकतीच सुरू झाल्यामुळे या खलनायकाची कारस्थानं आता हळूहळू दिसू लागतील.
वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा
तर, असे हे खलनायक. मालिकेत देखणे कलाकार, विनोदी पात्रं, सुंदर गोष्ट, मांडणी, अप्रतिम लोकेशन्स असं सगळंच असलं तरी त्या मालिकेला एका तडक्याची गरज असते. तो तडका म्हणजे खलनायक. ही खलनायक पात्रं कधी विनोदी स्वरूपाची, कधी कारस्थानी, कधी भयावह, कधी गंभीर तर कधी मागून वार करणारी असतात. फक्त हा तडका गरजेपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी प्रत्येक चॅनेलने घ्यायला हवी. तरच त्याची चव उत्तम लागेल. ‘नायक नहीं खलनायक हू मैं’ असं म्हणण्याऐवजी ‘खलनायक नहीं नायक हू मैं’ असंच मालिकांमधल्या सगळ्या खलनायकांनी म्हणावं. कारण त्यांच्याशिवाय मालिकेत मजा नाही. खलनायकाच्या वागण्यामुळेच नायिका जिंकण्याचा आटापिटा करते. मग तेच राहिलं नाही तर तिचाजिंकण्याचा आटापिटा व्यर्थ आणि त्यानंतर प्रेक्षकांना मिळाणारा आनंदही व्यर्थच आहे. त्यामुळे तेही हिरोच आहेत मालिकेचे असं म्हणू या!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11
सौजन्य – लोकप्रभा