नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या गार वाऱ्यासोबत राज्यातील तरुणाईमध्ये रंगभूमीचा उत्साह संचारला होता. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, नागपूर, कोल्हापूर विभागांमधील हजारो रंगकर्मीचे शेकडो संघ ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या प्राथमिक विभागांच्या पायऱ्यांपासून या सोहळ्याच्या अंतिम फेरीचे ध्येय बाळगून दाखल झाले. महिनाभर विविधांगी विषयांची घुसळण घडून महाअंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या आठ लोकांकिकांमध्ये प्रत्येक विभागाचा वैशिष्टय़पूर्ण भाषिक लहेजा आणि वातावरण यांच्यांत चुरस होती. समान होती ती त्यांच्या मेहनतीची मात्रा, विषयाच्या मांडणीतील धडपड आणि आपल्या भवतालाला समजून घेण्याची ताकद. ताज्या सामाजिक घटनांवर एकांकिकेच्या माध्यमातून व्यक्त होताना या मुलांनी मराठी रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल असल्याची साक्ष दिली.

ग्लोकल तडाख्यात सापडलेल्या राज्यातील विचारशील, प्रगल्भ आणि धुमसत्या तरुणाईला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘लोकसत्ता’च्या या माध्यमाला आता मराठी रंगभूमीमध्ये विशेष ओळख मिळाली आहे. प्रथितयश अभिनेते-अभिनेत्री यांच्यापासून नाटय़ क्षेत्रामधील नावाजलेल्या कलाकारांचा सहवास आणि मार्गदर्शन या सोहळ्यातील स्पर्धकांना मिळते. त्यांची सळसळती ऊर्जा, नवखेपणामुळे तयार होणाऱ्या भीतीवर मात करून आपल्या विषयाला आणि संघाला सर्वोत्तम स्थानी पोहोचविण्यासाठी आतुर असलेल्या विद्यार्थी कलाकारांनी यंदाचे वर्षही दणाणून सोडले. प्राथमिक फेरीपासूनच स्पर्धकांतील गुणांचा कस पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी होती. मुंबईमध्ये गेल्या आठवडय़ात राज्यभरात आपापल्या विभागातून सरस ठरलेल्या एकांकिकांचे एकेक रंग उलगडत गेले. स्थानिक मुंबई-ठाणेकर स्पर्धकांहून मानसिक बळ एकटवत राज्याच्या सर्वच कोपऱ्यांमधील नवरंगकर्मीनी महाअंतिम सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा घाट घातला. मान्यवर आणि रसिकांच्या अलोट गर्दीने महाअंतिम सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. सोहळ्याचे फलित म्हणजे दिग्दर्शन, अभिनय, लेखन, ध्वनिसंयोजन, प्रकाशयोजन, नेपथ्य, वेशभूषा यांच्याबाबतचा वैविध्यपूर्ण संकल्पनाविष्कार यानिमित्ताने सर्वाना पाहायला मिळाला. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत मान्यवर आणि रंगभूमीच्या जाणकारांनी मांडलेली मते.

विनय आपटे स्मृती पुरस्कार

‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत दरवर्षी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक विनय आपटे यांच्या स्मृतीनिमित्त सवरेत्कृ ष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार दिला जातो. यावर्षी ‘लोकांकिका’चा बहुमान मिळवलेल्या ‘सॉरी परांजपे’ या एकांकिके च्या दिग्दर्शनासाठी ऋषी मनोहर याला हा सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.

धुमसत्या तरुणाईच्या विचारांना व्यासपीठ

‘लोकसत्ता लोकांकिका’चा वृक्ष दरवर्षी विस्तारतो आहे. मुलांनी व्यक्त व्हावे आणि रंगभूमीवर काही नवे प्रयोग व्हावेत हा या स्पर्धेमागील हेतू साध्य होताना दिसतो आहे. स्पर्धेला मिळणारा प्रतिसादही वाढतो आहे, म्हणजे फक्त संख्यात्मक नाही तर सुजाण प्रतिसाद मिळतो आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’कडे गांभीर्याने पाहिले जाते. मुलांची विषयांना थेट भिडण्याची वृत्ती आनंद देणारी, आशा निर्माण करणारी आहे. मुलांना त्यांच्यातील गुणांची ओळख होण्यासाठी आणि मुलांमधील गुण सर्वासमोर येण्यासाठी चांगल्या संधीची गरज असते ती या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते.’

दिलीप कुलकर्णी, सॉफ्ट कॉर्नर

‘गोष्टी नव्याने हुडकून काढून लोकांपर्यंत पोहोचवणे हे ‘लोकसत्ता’चे वैशिष्टय़ आहे. ज्याप्रमाणे बातम्यांच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ वेगळे काही देत असते. त्याप्रमाणे लोकांकिकांच्या निमित्ताने तरुणाईला एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाचा विद्यार्थ्यांनीही खूप उत्तम लाभ घेतला. मुलांकडे असलेले सामाजिक भान यानिमित्ताने समोर आले. मुले खूप विचार करतात आणि तो मांडण्यासाठी त्यांना ‘लोकसत्ता लोकांकिका’सारख्या संधी मिळणे गरजेचे आहे.’

केसरीभाऊ पाटील, केसरी टूर्स

‘लोकसत्ता लोकांकिका’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. महाराष्ट्राला असलेली रंगभूमीची परंपरा राखण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ करते. आपल्यातील कौशल्य सादर करण्याची संधी आणि त्याचबरोबर मार्गदर्शन मिळणे आजच्या पिढीसाठी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळाव्यात आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे हा इंडियन ऑइलचाही उद्देश आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या उपक्रमातील सहभागाचा आम्हालाही आनंद आहे.

अनुराग शुक्ला, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून तरुणाईने वैविध्यपूर्ण आणि धाडसी विषय हाताळले. आजची पिढी विचार करीत नाही हे ही स्पर्धा पाहून, मुलांचे सादरीकरण पाहून पटूच शकत नाही. मुलांच्या सादरीकरणात वरवरचा विचार नव्हता. आधीची पिढी अनेक गोष्टींवर मोकळेपणाने बोलू धजत नव्हती असे अनेक सामाजिक विषय मुलांनी बेधडकपणे मांडले. मुलांना व्यक्त होण्यासाठी ही स्पर्धा चांगले माध्यम आहे.

गीता मणेरीकर, पितांबरी

आम्ही सतत नव्या आणि सक्षम कलाकारांचा शोध घेत असतो. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून अनेक गुणवान कलाकार आम्हाला मिळाले. यंदाच्या स्पर्धेतूनही आम्हाला नवे कलाकार मिळाले. लवकरच त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत. मुलांचे सामाजिक भान या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले. समाजमाध्यमांमुळे मुळातच मुलांमधील संवेदनशीलता वाढलेली दिसते. त्यांना प्रत्येक गोष्टीवर मते असतात आणि ती व्यक्तही करायची असतात. स्पर्धेच्या माध्यमातून ही व्यक्त होण्याची धडपड दिसून आली.

बवेश जानवलकर, झी युवा

‘लोकसत्ता लोकांकिका’मधून राज्यभराचे प्रतिनिधित्व दिसले. विषयांच्या निवडीत वैविध्य होते. अनेक नवे, चांगले विषय मुलांनी हाताळले. मात्र एक गोष्ट जाणवली. मुलांची विषयाची निवड चांगली असते. मात्र लिखाण अजून सशक्त असण्याची आवश्यकता आहे. विचार किंवा विषय चांगले असले तरी त्याची मांडणी कशी करावी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

वैजयंती आपटे, नाटय़निर्माती