सुहास भोसले दिग्दíशत ‘रेती’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रमोद गोरे निर्मित या चित्रपटाच्या निमित्ताने अवैध वाळू उपसा, वाळू माफिया हे आपल्याला वाचून, ऐकून माहिती झालेल्या गोष्टींचा सविस्तर पट तर डोळ्यासमोर येणे साहजिक आहे. मात्र ऐकूनही कानाडोळा करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी या समांतर सुरू असलेल्या दुष्टचक्रामुळे कोणते संकट आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहे, याची जाणीव या चित्रपटातून पहिल्यांदाच होणार असल्याचे अभिनेता चिन्मय मांडलेकर याने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्ही- नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून लीलया वावरणारा अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकरची ख्याती आहे. गेल्या वर्षभरात चिन्मयने ‘लोकमान्य’ या चित्रपटापासून वसंतराव नाईकांच्या चरित्रपटांपर्यंत अनेक भूमिका केल्या. याही वर्षी ‘तिचा उंबरठा’ हा त्याचा चित्रपट आधी प्रदíशत झाला आहे. मात्र ‘रेती’ हा चित्रपट वेगळा असल्याचे चिन्मयने सांगितले. प्रामाणिकपणे सांगायचं तर वाळूमाफियांसंदर्भातील अनेक घटना मीही वर्तमानपत्रांतून वाचलेल्या होत्या. मात्र या विषयाची व्याप्ती किती आहे हे मला तेव्हा जाणवलं नव्हतं. चित्रीकरणासाठी आम्ही जेव्हा वाळू उपसा केलेल्या नद्यांच्या खोऱ्यांपर्यंत पोहोचलो तेव्हा हा प्रश्न पर्यावरणाच्या दृष्टीने किती गंभीर आहे, याची जाणीव पहिल्यांदा आम्हाला झाली, असे त्याने सांगितले. यातला विरोधाभास असा की रेतीचा सर्वात जास्त वापर कुठे तर शहरांत आपल्या घरांच्या बांधकामांसाठी होतो. मात्र ही रेती कुठून येते, यामागे काय उपद्व्याप केले जातात आणि त्याचा आपल्याशी थेट संबंध कसा आहे हे जाणून घेण्याचा आपण कधीही प्रयत्न करत नाही, यावर हा चित्रपट बोट ठेवत असल्याचे चिन्मयने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta movie review on reti marathi movie
First published on: 27-03-2016 at 03:01 IST