पंखे काढा, आत्महत्या टाळा – राखी सावंत

परिषदेला राखी आली ती खांद्यावर पंखा घेऊनच. राखीचा अवतार पाहून पत्रकारही गोंधळले.

अभिनेत्री राखी सावंत (संग्रहित छायाचित्र)

राखी सावंतचा अजब सल्ला

प्रत्युषासारख्या देशातील आई-बहिणींच्या आत्महत्या टाळायच्या असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घराघरातील छताला लटकणारे पंखे काढून टाकण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती अभिनेत्री-मॉडेल राखी सावंतने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली आणि पत्रकारही अवाक झाले. ओशिवरा पोलीस ठाण्याच्याच हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

परिषदेला राखी आली ती खांद्यावर पंखा घेऊनच. राखीचा अवतार पाहून पत्रकारही गोंधळले. आईवडिलांचे मुलींवर, भावांचे बहिणीवर प्रेम असेल तर आत्महत्येचे मूळ असलेला पंखा उखडून टाका, असे राखीने सांगताच पत्रकारही भिरभिरले. अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी माध्यमांसमोर मांडेन, असेही ती म्हणाली.

प्रत्युषाची आत्महत्या नसून तिची हत्या झाली आहे, त्याविषयीचे पुरावे माझ्याकडे आहेत, राहुल राज सिंहची मैत्रिण सलोनी हिने मला एक चित्रफित पाठवली आहे. ती आज मी दाखवणार होते, पण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आधी कबूल करुन ऐनवेळी या पत्रकार परिषदेला येण्याचे टाळल्याने मी चित्रफीत दाखवू शकणार नाही, असे राखीने प्रास्ताविकात सांगितले.

‘लौटकर आओ प्रत्युषा’ असा फलक राखीच्या मागे लावण्यात आला होता. पत्रकार परिषदेला तिने कमालीच्या गांभीर्याने सुरुवात केली. प्रत्युषाच्या पालकांना सरकारने पाच कोटींची भरपाई द्यावी अशी मागणी तिने केली आणि सर्वाच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली, मग राखीने खास तिच्या शैलीत फटकेबाजी सुरु केली. प्रत्युषासारख्या देशातील मुली वाचवायच्या असतील, आत्महत्या टाळायच्या असतील तर, घराघरात असलेले पंखे काढून टाकण्यास सुरुवात करा, असा संदेश दिला, आणि पत्रकार उडालेच. मग, उकाडय़ाचा सामना कसा करायचा हे विचारल्यावर, वातानुकूलित यंत्रे, टेबलपंखे यांचा वापर करा, असेही सांगायला राखीने कमी केले नाही.

मग, एका प्रसिध्द अभिनेत्रीने इमारतीवरुन जीव दिला होता मग गगनचुंबी इमारतीही बांधू नयेत का, असे विचारल्यावर राखी चिडली. हेच उपाय जर मनुष्यबळ मंत्र्यांनी सांगितले असते तर तुम्ही ते मान्य केले असते, पण केवळ मी सांगतेय म्हणून तुम्ही हसण्यावारी नेऊ नका असाही सल्लाही तिने दिला. तब्बल ४५ मिनिटे अव्याहत बोलत बसलेल्या राखीने मग बरीच अतार्किक विधाने केली मात्र, प्रत्युषाच्या आत्महत्येविषयी राखी काहीतरी सांगेल अशी आशा घेऊन आलेल्या सर्व पत्रकारांच्या अपेक्षा मात्र हवेतच विरुन गेल्या..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ma beti bachao sirf table fan lagao rakhi sawant bizarre reaction to pratyusha banerjees suicide

ताज्या बातम्या