महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे दोन गट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार गुवाहाटीला थांबले आहेत. याचदरम्यान गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये ते गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसले. आता त्यांच्या या ऑडिओ क्लिपच्या आधारावरच अभिनेते-कवी किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांनी कविता तयार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “हिंदूंनो जागे व्हा…”; उदयपूर हत्या प्रकरणाबाबत शरद पोंक्षे यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत

“काय झाडी…काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके!’ शाहाजीबापू यांच्या या शब्दांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. पण या संवादामधील गंमत बाजूला ठेवून सौमित्र यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी सुंदर कविता तयार केली आहे. “काय झाडी… काय डोंगार…काय हाटील…एकदम ओके!’ या संवादाचा आधार घेत सौमित्र यांनी कविता सादर केली.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांच्या हटके लूकची चर्चा, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

वाचा सौमित्र यांची कविता
काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

काय समाज काय उमेदवार काय पक्ष
काय आमदार काय खासदार काय लक्ष

काय नेता काय जनता काय विश्वास
काय खरं काय खोटं काय आभास

काय श्रीमंत काय मध्यमवर्ग काय गरीब
काय सुदैव काय दुर्दैव काय नशीब

काय मतदार काय कॅांन्टीट्यूएंसी काय सत्ता
काय फायस्टार काय थ्री स्टार काय गुत्ता

काय भाषणं काय घोषणा काय नारे
काय मौसम काय वादळ काय वारे

काय विचार काय बांधिलकी काय तत्वं
काय पक्षनेता काय कार्यकर्ता काय स्वत्वं

काय बातम्या अन् अग्रलेख काय संपादक
काय ढोबळ वैचारिकन् काय आस्वादक

काय चॅनल काय मीडिया काय पेपर
काय शिणिमा काय ष्टोरी काय ठेटर

काय फेसबुक काय वॅाट्सप काय ट्विटर
काय ब्रिलियंट काय बकवास काय चीटर

काय युपी काय महाराष्ट्र काय बिहार
काय आर्थर काय येरवडा काय तिहार

काय सकाळ काय दुपार अन् संध्याकाळ
काय विमान काय पायलट काय आभाळ

काय झाडी काय डोंगार काय हाटील
काय गावकरी काय सरपंच काय पाटील

आणखी वाचा – सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, फुफ्फुसाच्या आजारामुळे पतीचं निधन

फेसबुकद्वारे त्यांनी ही कविता शेअर केली आहे. त्यांची ही कविता सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. आताच्या राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करणारी ही कविता नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis eknath shinde shiv sena mla shahaji patil audio clip from guwahati actor kishor kadam poem viral on social media kmd
First published on: 29-06-2022 at 16:07 IST