flashback, ajay devgnमहेश भट्ट काळापुढचा दिग्दर्शक असे म्हणणे मिळमिळीत ठरावे असा त्याचा आशयापासून वादांपर्यंत आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यापासून एकाच वेळी तीन-चार चित्रपटांचे काम करण्याचा अक्षरश: झपाटा होता. वीस-पंचवीस वर्षापूर्वीच तो जणू ‘मोबाईल’चा प्रत्यय देई. वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत ‘अंगारे’च्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना बोलावले असताना तो शेजारच्या सेटवर ‘ड्युप्लीकेट’च्या चित्रीकरणात गुंतला असल्याचे दिसले. फिल्मालयला ‘चाहत’चा सेट लागल्याचे समजले, तेव्हा तो कुठे तरी ‘नाराज’च्या कामातर बिझी असे. या गडबडीत तो ‘साथी’ पूर्णदेखील करे. त्याला हे असे एकदम तीन-चार चित्रपटांच्या दिग्दर्शनात लक्ष्य घालणे जमते कसे? या प्रश्नावर त्याचे हुकमी उत्तर असे, मी चोवीस तास सिनेमाचाच विचार करतो. त्यात तत्थ्यही असे. कारण, भराभर मुद्दे मांडण्यात, ते करताना आजूबाजूच्या सामाजिक, संस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील संदर्भ देण्यात तो तयारच असे. संजय दत्तला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याने १९ एप्रिल १९९३ रोजी पहिल्यांदा अटक झाली तेव्हा महेश भट्टचा ‘गुमराह’ पूर्णतेच्या अंतिम टप्प्यात होता. जराही गोंधळून न जाता महेश भट्टने पटकथेत आवश्यक फेरफार केले आणि संजूबाब परतल्यावर त्याची गरज शक्यतितकी कमी केली, याला म्हणतात व्यावसायिक हुशारी. त्याचा पहिला चित्रपट ‘मंझिले और भी हैं’ सेन्सॉरने कायम रखडवला तरी महेश भट्टचा प्रवास थांवला नाही. ‘सारंश’, ‘अर्थ’, ‘दिल हैं के मानता नही’ हे या एकाचं माणसाचे यावर विश्वास बसू नये, अशी विविधता… दिग्दर्शन थांबवले तरी तो काहीना काही कारणास्तव बातमीत आहे. खऱ्या सिनेमावाल्याला आणखी हवे ते काय?
दिलीप ठाकूर