लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाचाच थरकाप उडवणारा महेश कोठारे यांचा ‘तात्या विंचू’ हा खलनायक आजही प्रेक्षकांच्या चागलाच लक्षात आहे. आता हाच खलनायकी बाहुला रुपेरी पडद्यावर परत येतो आहे. निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात ‘झपाटलेला ३’ सिनेमाची घोषणा केली. २०१३ मध्ये ‘झपाटलेला २’ सिनेमा प्रदर्शित झाला होता.

त्यामुळे तात्या विंचूला भेटण्याची प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा वाढणार आहे. ‘झपाटलेला’ सिनेमाची लोकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच मी ‘झपाटलेला ३’ करायचे ठरवले,’ असे कोठारे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी कोठारे यांनी ट्विटरवर तात्या विंचूचा फोटो टाकत चाहत्यांना तो परत येत असल्याचे संकेतच दिले होते. पण आता कोठारेंनी ‘झपाटलेला ३’ ची अधिकृत घोषणा केल्यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याचीच आता अनेकांना उत्सुकता लागली आहे.

‘झपाटलेला २’ हा मराठीतील पहिला थ्रीडी आणि सिक्वल असलेला सिनेमा ठरला होता. या सिनेमात आदिनाथ कोठारे, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मधू कांबीकर, सुनील तावडे, दिलीप प्रभावळकर आणि महेश कोठारे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका होत्या.

थ्रीडी कॅमेऱ्यांसह परदेशी तंत्रज्ञानाची ‘झपाटलेला २’च्या निर्मितीसाठी मोठी मदत झाली होती. सिनेमाची गाणी गुरू ठाकूर याने लिहिली होती, तर अवधूत गुप्ते याने संगीत दिले होते. ‘झपाटलेला ३’ मध्ये आता कोणते कलाकार काम करणार तसेच या सिनेमाचे संगीत कसे असणार याबद्दलही आम्ही लवकरच तुम्हाला सांगू.