सध्या देशात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या व्हायरसाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाउन करण्याची घोषणा केली. या लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सारे काही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण देखिल थांबवण्यात आले. आता सतत चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असलेले कलाकार देखील घरात बसले आहेत. पण या काळात ते काय करत आहेत? हे जाणून घेण्यास सर्वचजण उत्सुक असतात. नुकताच निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लॉकडाउनच्या काळात बहुतेक कलाकार हे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. महेश मांजरेकरदेखील आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. या व्हिडीओमध्ये ते स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेधा त्यांना जेवणात कोणते मसाले वापरले आहेत असे विचारताना दिसत आहेत.
‘दबंग ३’ या सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महेश मांजरेकर यांची मुलगी सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘फायनल आऊटकम पाहण्यासाठी पुढचा फोटो पाहा’ असे तिने कॅप्शन दिले आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये महेश मांजरेकर जेवण बनवत आहेत तर मेधा आणि सई त्यांना मदत करताना दिसत आहे.