बॉलीवूडचा बादशहा शाहरुखने अखेर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची इच्छा पूर्ण केली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने ‘रईस’ चित्रपटामध्ये पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली आहे. शाहरुखसोबतच्या या चित्रपटामुळे माहिरा चांगलीच चर्चेत आली होती. उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखचा बहुचर्चित चित्रपटाला माहिरा खानमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. परिणामी चित्रपटातील शाहरुख-माहिराची केमिस्ट्री प्रमोशन दरम्यान पाहायला मिळाली नव्हती. सध्या ‘रईस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामाई करताना दिसत आहे. चित्रपटाच्या यशामध्ये शाहरुखने वेगवेगळ्या पद्धतीने केलेले प्रमोशन देखील महत्त्वाचा भाग आहे.
बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चित्रपटातील अभिनेत्यासोबतच हल्ली अभिनेत्रीलाही तितकेच महत्त्व दिले जाते. असे असताना माहिरा मात्र शाहरुखसोबत प्रमोशन करताना दिसली नव्हती. चित्रपटाच्या यशावर काही परिणाम होऊ नये, म्हणून माहिराला प्रमोशनापासून लांब ठेवण्यात आल्याचे दिसले. दरम्यान माहिराने देखील प्रमोशनमध्ये सहभागी नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. मात्र निराश न होता प्रमोशन करणे हा माझा अधिकार असल्याचे सांगत माहिराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘रईस’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्याची शक्कल शोधली होती. पाकिस्तानी कलाकारांना भारतात होणारा विरोध पाहता माहिराने हा मार्ग अवलंबला होता. ‘स्काईप’च्या सहाय्याने माहिराने ‘रईस’ संदर्भातील मुलाखती दिल्याचे देखील पाहायला मिळाले. शाहरुख खान विविध कार्यक्रमातून ‘रईस’ चे प्रमोशन करत असताना माहिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शक्य त्या सर्व परिंनी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देखील शाहरुख त्याच्या चित्रपटाचे प्रदर्शन करताना दिसत आहे. दरम्यान, शाहरुखने त्याच्या जालिमाचे दुख जाणून अखेर तिच्यासोबत प्रमोशन केल्याचे दिसले. शाहरुखने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून माहिरासोबत प्रमोशन केल्याचे दिसून आले. यावेळी शाहरुखसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आणि रितेश सिधवानी आणि सहकलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी देखील होते. यावेळी माहिराला चित्रपटासंदर्भात प्रश्न देखील विचारण्यात आले. माहिराने देखील विचारलेल्या प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली. ‘रईस’ चित्रपट करताना तुला कशाची भीती वाटली होती का? असा प्रश्न माहिराला विचारण्यात आला होता. यावर माहिराने शाहरुखची फारच भीती वाटल्याचे सांगितले. प्रेक्षकांची नजर माझ्यापेक्षा जास्त शाहरुखकडे असेल याची भीती होती, असे ती म्हणाली. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर माझी ही भीती नाहीसी झाली, असे सांगायलाही माहिरा विसरली नाही. चित्रपटातील माझ्या भूमिकेला ही प्रेक्षकांनी दाद दिल्याचे ती म्हणाली.