बॉलिवूड अभिनेता अरबाज खान मलायका सोबतच्या घटस्फोटासंबंधीचे मौन सोडले आहे. आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय हा परिपक्वतेतून घेतलेला आहे. त्यामुळे नातेमध्ये दुरावा निर्माण होईल याची काळजी वाटत नाही, असे अरबाजने डेक्कन क्रोनिकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. आम्ही वेगळे झालो असलो तरी आमच्यातील नाते टिकून राहिल असा विश्वासही अरबाजने व्यक्त केला. मलायकाच्या कुटुंबासोबत गेले २१ वर्षे चांगले संबंध आहेत. हे संबंध आयुष्यभर कायम राहतील असेही तो म्हणाला. आम्ही दोघे विभक्त झालो असलो तरी मुलाच्या संगोपनाची जबाबदारी विसरणार नसल्याचे सांगायलाही अरबाज यावेळी विसरला नाही.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका आरोरा या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांनी जेव्हा वेगळे राहणे सुरु केले, तेव्हाच त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांना उधाण आले होते. त्यानंतर मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. अखेर तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळे होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यानंतर मलायकाने घटस्फोटातील पोटगीच्या रकमेसाठी जवळपास १० ते १५ कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्ताचीही चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र हे वृत्त अफवा असल्याचे बोलले गेले. दोघांच्या विभक्त होण्याच्या जेवढ्या चर्चा रंगल्या तेवढ्याच चर्चा ही जोडी एकत्र दिसल्यानंतर रंगल्या. ही जोडी जेव्हा एकत्र दिसते त्यावेळी दोघांच्यातील दुरावा कमी होणार अशा चर्चांना देखील उधाण आल्याचे पाहायला मिळाले. मलायका आणि अरबाजने गोव्यात एकत्र नवीन वर्षाचे स्वागत केले होते. त्यामुळे त्यांचा घटस्फोट जरी होत असला तरी त्यांच्यात मैत्रीचे संबंध राहतील हे दिसून येते. मलायकाची बहिण अमृता अरोरा हिने इन्स्टाग्रावर पार्टीचे फोटो शेअर केले होते. त्यात मलायकासोबतअरबाजही दिसला होता. दरम्यान, अरबाज आणि मलायका विभक्त होण्याच्या निर्णयामध्ये अरबाज-मलायकामध्ये तिसरा व्यक्ती आल्याची चर्चादेखील रंगल्या होत्या. बॉलिवूडची जोडी फुटण्यामागे अर्जुन कपूर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अर्जुन आणि मलायका अरोरा खानमधील वाढत्या मैत्रीमुळे ती अरबाजपासून दूर होत असल्याचे वृत्त चर्चेत होते. त्यासोबतच असेही म्हटले जातेय की, अरबाज खानच्या आयुष्यातही ‘ती’चे आगमन झाले आहे. पण, अरबाजच्या आयुष्यातील ‘ती’ नेमकी आहे तरी कोण यावरुन अद्यापही पडदा उठला नाहीये. पण अरबाजने घटस्फोटावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या मुलामुळे दोघांच्यातील नाते अतुट राहणार असेच दिसतय.