भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असणारा ‘आयफा पुरस्कार सोहळा’ यंदा फ्लोरिडा येथे होणार आहे. या पुरस्कारांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘आयफा रॉक्स’ या फॅशन सोहळ्याचा केंद्रबिंदू असणार आहे ती बॉलीवूडची आयटम गर्ल मलायका अरोरा. भारतातील आघाडीचा ड्रेस डिझायनर विक्रम फडणीस याने डिझाईन केलेल्या खास कलेक्शनसह मलायका अरोरा रॅम्पवर अवतरणार आहे. या फॅशन सोहळ्यात विक्रम फडणीसने डिझाईन केलेल्या ‘नजाकत’ या कलेक्शनमधील काही खास नमुने पेश करण्यासाठी मलायका अरोरा या फॅशन शोचे सारथ्य करणार आहे. ‘आयफा रॉक्स’ सोहळ्यासाठी आपण खूपच उत्सुक असल्याचे मलायकाने सांगितले. तसेच विक्रमच्या नजाकत हे कलेक्शन म्हणजे स्त्रीपणाचा उत्सव असल्याचे तिने सांगितले. ‘नजाकत’ हे जागतिक दर्जाचे कलेक्शन असून या माध्यमातून भारतीय वस्त्रपरंपरेला पूर्णपणे न्याय देण्यात विक्रम फडणीस यशस्वी ठरल्याच्या भावना मलायकाने यावेळी व्यक्त केल्या. येत्या २४ एप्रिल रोजी ‘आयफा पुरस्कार सोहळा’ फ्लोरिडा येथे होणार असून बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaika arora khan to show stop at iifa rocks
First published on: 16-04-2014 at 01:33 IST