Malayalam Actor: २०१५ च्या ड्रग्ज प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेला मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाको, संशयित ड्रग्ज वापराशी संबंधित पोलिसांच्या छाप्यादरम्यान उत्तर एर्नाकुलममधील एका हॉटेलमधून पळून जातानाची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अभिनेता शाईन सध्या फरार आहे.

ही घटना घडली तेव्हा अभिनेता शाईन हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर होता. पोलिसांना पाहताच तो खिडकीतून पळून गेला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो आणि त्याचे दोन साथीदार तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उडी मारताना, नंतर स्विमिंग पूलमध्ये उडी मारताना आणि नंतर पायऱ्या उतरताना दिसत आहेत. हॉटेलमधील त्याच्या खोलीची कसून तपासणी केली असता कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाहीत. असे असले तरी शाईनला पोलिसांच्या छाप्याची माहिती मिळाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

योगायोगाने, अभिनेता विन्सी अलोशियसने केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सकडे शाईन टॉम चाकोविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीपूर्वी विन्सी अलोशियसने सोशल मीडियावर एक पोस्टही केली होती. ज्यामध्ये तिने ड्रग्ज सेवन करणाऱ्या एका सह-कलाकाराकडून अनुचित वर्तनाचा सामना करावा लागत असल्याचे भाष्य केले होते.

या पोस्टमध्ये तिने कोणत्याही अभिनेत्याचे नाव घेतले नव्हते. पण, नंतर विन्सीने अनुचित वर्तन करणारा सह-कलाकार शाईन टॉम चाको होता असा खुलासा केला होता. याचबरोबर त्याने आगामी चित्रपट ‘सूत्रवाक्यम’च्या शूटिंगदरम्यान ड्रग्ज सेवन केल्याचा आरोपही केला होता.

या घटनेचा आढावा घेण्यासाठी फिल्म चेंबर सोमवारी बैठक घेण्याचे नियोजन करत असून, कोची उत्पादन शुल्क विभाग विन्सी अलोशियसने केलेल्या दाव्यांची चौकशी करत आहे.

कोण आहे शाईन टॉम चाको?

शाईन टॉम चाको हा मल्याळम चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता आणि माजी सहाय्यक दिग्दर्शक आहे. त्याने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक कमल यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

चाकोने २०११ मध्ये ‘खड्डामा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पण, २०१९ मध्ये आलेल्या ‘इश्क’ या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. या चित्रपटासाठी, शाईन टॉमला २०१९ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता’ (मल्याळम) पुरस्कार देखील मिळाला आहे.