मुंबईची ओळख समजला जाणारा ‘मामि’ (मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यावर्षी केवळ काही मोजके चित्रपटकर्मी आणि चित्रपटप्रेमींनी दिलेल्या भरघोस आर्थिक मदतीच्या बळावर ‘साजरा’ होणार आहे. गेल्या काही वर्षांत नियमित होणारा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ते सर्वात खर्चिक, भव्य आणि ग्लॅमरस अशा महोत्सवाचे स्वरूप ‘मामि’ला प्राप्त झाले होते. मात्र, ज्या रिलायन्सच्या बळावर महोत्सवाने दोन-तीन वर्षांत जोर धरला होता त्यांनीच यावर्षी महोत्सवातून आपले अंग काढून घेतल्याने ‘मामि’चा गाशा गुंडाळण्याची वेळ आली होती. आता ते संकट टळले असून १४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे.

दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी मिळून महोत्सवासाठी ११ लाख रुपये दिले. त्यांच्यापाठोपाठ ‘आँख देखी’ या रजत कपूर दिग्दर्शित चित्रपटाचे निर्माते मनिष मुंद्रा यांनी ५० लाख रुपये दिले. तर आनंद महिंद्रा आणि रोहित खत्तार यांच्या ‘सिनेस्तान फिल्म कंपनी’ने ६० लाख रुपये जमा केले. इतक्या कमी वेळात दीड कोटी रुपये जमा झाल्यानंतर आमचा हुरूप वाढला होता. त्यामुळे आता वैयक्तिक स्तरावरही राजकुमार हिरानी, ‘फँड्री’चे निर्माते विवेक कटारिया आणि निलेश नवलखा, दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या मदतीतून यंदाच्या महोत्सवासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्याचे नारायणन यांनी सांगितले.
रिलायन्सच्या पाठिंब्याने झालेल्या ‘मामि’ महोत्सवाचा खर्च हा ६.१३ कोटी होता. मात्र, यावर्षी अगदी कमीत कमी खर्चात महोत्सव क रण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकारनेही महोत्सवासाठी करांमध्ये सवलत दिली असून दहा लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. या सगळ्यांच्या मदतीने यावर्षीचा ‘मामि’ महोत्सव होणार असून त्याची घोषणा १७ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत देऊ केली आहे त्यांचा उल्लेख असलेले विशेष पोस्टरही ‘मामि’साठी तयार करण्यात येणार आहे.
यावर्षी हा महोत्सव अशारितीने पार पडला असला तरी दरवर्षी महोत्सव हा मदत मागून होऊ शकणार नाही. त्यामुळे यंदाचा महोत्सव संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पुढच्या दहा वर्षांसाठीचे आर्थिक नियोजन करण्यात येणार असल्याचेही नारायणन म्हणाले.

दोन दिवसांत दीड कोटींचा निधी
‘मामि’ महोत्सव यंदा प्रायोजकांअभावी होणार नाही, असे वृत्त पसरल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आणि चित्रपटप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली होती. ‘मामि’च्या आयोजकांनीही महोत्सवासाठी निदान देणगी स्वरूपात निधी मिळावा, यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॅम्पेन सुरू केले होते. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि दोन दिवसांत आमच्याकडे दीड कोटींचा निधी जमा झाला, अशी माहिती महोत्सवाचे संचालक श्रीनिवासन नारायणन यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.